The Chennai young engineer is credited with finding the remains of 'Vikram Lander'; NASA confesses to providing useful information | ‘विक्रम लॅण्डर’चे अवशेष शोधण्याचे श्रेय चेन्नईच्या तरुण अभियंत्याला; उपयुक्त माहिती दिल्याची ‘नासा’ची कबुली

‘विक्रम लॅण्डर’चे अवशेष शोधण्याचे श्रेय चेन्नईच्या तरुण अभियंत्याला; उपयुक्त माहिती दिल्याची ‘नासा’ची कबुली

चेन्नई : ७ सप्टेंबर रोजी चंद्रावर अलगद उतरण्याऐवजी आदळून नष्ट झालेल्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेतील विक्रम लॅण्डरचे अवशेष नेमके कुठे व कशा अवस्थेत आहेत याचा शोध घेण्यात चेन्नईच्या षण्मुग सुब्रमणियन या तरुण अभियंत्याने दिलेल्या माहितीची मोलाची मदत झाली, अशी पोचपावती नासाने दिली आहे. विक्रम लॅण्डरचे अवशेष हुडकून काढण्याचे श्रेय या तरुणाला मिळाले आहे.

विक्रम लॅण्डरचे अवशेष उतरण्याच्या स्थळापासून जवळच विखरून पडल्याचे नासाने जाहीर केले होते. चंद्राभोवती घिरट्या घालण्यासाठी गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरने सोडलेल्या ल्युनार रिकनेसॉँ आॅर्बिटरने पाठविलेल्या छायाचित्रांचे विश्लेषण करून नासाने विक्रमच्या अवशेषांचा शोध लागल्याचा निष्कर्ष काढला होता. या प्रक्रियेत षण्मुग सुब्रमणियनची माहिती मोलाची ठरली, असे नासाने कळविले आहे. ‘एलआरओसी’चे उपप्रकल्प वैज्ञानिक जॉन केलर यांनी ई-मेल पाठवून त्याच्या योगदानाचे श्रेय दिले आहे.

केलर म्हणतात की, विक्रमचे अवशेष सापडल्याचे कळविल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही निदर्शनास आणलेल्या ठिकाणाच्या आधीच्या व नंतरच्या छायाचित्रांमध्ये फरक दिसून येत असल्याची एलआरओसीच्या वैज्ञानिक चमूचीही खात्री पटली. आणखी विश्लेषण करून विक्रम लॅण्डर कुठे आदळले ते ठिकाण आम्ही निश्चित केले. त्याच्या आसपासच्या खुणाही विखुरलेल्या अवशेषांच्या आहेत, हेही नक्की झाल्यावर आम्ही तसे अधिकृतपणे जाहीर केले. यात तुम्ही केलेल्या निरीक्षणाच्या श्रेयाचीही यथायोग्य नोंद घेण्यात आली आहे.

एलअरओसीच्या कॅमेऱ्याने १७ सप्टेंबर रोजी घेतलेले चंद्राच्या संबंधित पृष्ठभागाचे पहिले मोझॅक छायाचित्र २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाले. अनेकांप्रमाणे षण्मुग यांनीही ते डाऊनलोड करून घेतले. त्यावरून त्यांनी विक्रमच्या अवशेषांच्या संभाव्य स्थळांचा शोध लावला व आम्हाला कळविले. तेच सूत्र पकडून त्या भागाची १४ व १५ आॅक्टोबर व ११ नोव्हेंबर रोजी उजेडातील मोझॅक छायाचित्रे घेण्यात आली. छायाचित्रातील खुणा ‘विक्रम’च्या अवशेषांच्याच असल्याची त्यावरून खात्री झाली.

षण्मुग सुब्रमणियन म्हणाले की, लॅण्डर अपेक्षेप्रमाणे सुखरूपपपणे चंद्रावर उतरले असते तर सामान्य लोकांत त्याविषयीचे स्वारस्य दीर्घकाळ टिकून राहिलेही नसते. पण दुर्दैवाने ते कोसळल्याने तो औत्सुक्याचा विषय बनला. अंतराळ व रॉकेटविषयी मला लहानपणापासून कमालीचे औत्सुक्य आहे. श्रीहरीकोटा येथून ‘इस्रो’चे कोणतेही रॉकेट सोडले जायचे तेव्हा त्याचे उड्डाण पाहण्यासाठी मी घराच्या गच्चीवर धावायचो. (वृत्तसंस्था)

४५ रात्रींंचे जागरण फळास आले
नासाच्या छायाचित्रांचा सलग ४५ रात्री जागरण करून अभ्यास करण्याचे जे कष्ट घेतले ते फळास आल्याचे समाधान ३३ वर्षीय षण्मुग यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, मी रोज कामावरून घरी आल्यानंतर रात्री २ वाजेपर्यंत व नंतर पुन्हा सकाळी ६ पासून ८ वाजेपर्यंत त्या छायाचित्रांचे बारकाईने निरीक्षण करून तुलना करत असे.

Web Title: The Chennai young engineer is credited with finding the remains of 'Vikram Lander'; NASA confesses to providing useful information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.