चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 08:18 IST2025-10-02T08:18:12+5:302025-10-02T08:18:43+5:30
मालेगाव शहर २००६ मध्ये चार बॉम्बस्फोटांनी हादरले होते. या घटनेनंतर १९ वर्षांनी विशेष न्यायालयाने मंगळवारी चार आरोपींविरोधात आरोप निश्चित केले.

चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
मुंबई : मालेगाव शहर २००६ मध्ये चार बॉम्बस्फोटांनी हादरले होते. या घटनेनंतर १९ वर्षांनी विशेष न्यायालयाने मंगळवारी चार आरोपींविरोधात आरोप निश्चित केले. दरम्यान, आरोपी मनोहर नरवारिया, राजेंद्र चौधरी, धन सिंग आणि लोकेश शर्मा यांनी आपण निर्दोष असल्याचे न्यायालयाला सांगितले.
खून आणि कट रचणे यांसारख्या आरोपांसह आरोपींवर यूएपीए कलमांखाली विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. एस. बाविस्कर यांनी आरोपींवर आरोप निश्चित केले. त्यामुळे आता आरोपींवर खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांनी यापूर्वी आरोपींवर मसुदा आरोप सादर केले होते. ३१ जुलै रोजी विशेष न्यायालयाने मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाचा निकाल देत सात आरोपींची सुटका केली. २००६ मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटलाही घटनेला १९ वर्षे उलटूनही सुरू झाला नाही. ८ सप्टेंबर २००६ रोजी मालेगावमध्ये चार बॉम्बस्फोट झाले. तीन बॉम्बस्फोट हमीदिया मशीद आणि बडा कब्रस्तानच्या परिसरात शुक्रवारच्या नमाजानंतर झाले, तर चौथा बॉम्बस्फोट मुशावरत चौकात झाला. यात ३१ जणांचा मृत्यू, तर ३१२ जण जखमी झाले होते.
असा चालला खटला
सुरुवातीला, आरोपी केलेल्या १३ पैकी ९ जणांना एटीएसने अटक केली. त्यानंतर हे प्रकरण वर्ग झाल्यानंतर सीबीआयने त्याच व्यक्तींच्या नावे पुरवणी आरोपपत्र दाखल केले. स्वामी असीमानंद यांनी २००६ च्या या बॉम्बस्फोटात उजव्या विचारसरणीचा कार्यकर्ता सुनील जोशी आणि त्याच्या माणसांचा हात असल्याचा कबुलीजबाब २०१० मध्ये दंडाधिकाऱ्यांसमोर दिला. त्यानंतर २०११ मध्ये तपास एनआयएकडे गेल्यानंतर असीमानंद यांनी जबाब मागे घेतला. मात्र, एनआयएने २०१३ मध्ये आणखी एक पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यात त्यांनी एटीएसने अटक केलेल्या ९ जणांचा स्फोटात हात नसल्याचे म्हटले. त्यानंतर, २०१६ मध्ये विशेष एनआयए न्यायालयाने ९ मुस्लीम आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता केली होती.