भाजपा महिला नेत्याच्या मृत्यूने खळबळ; पाय दुखल्याने रुग्णालयात नेलं, इंजेक्शन दिल्यावर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 13:59 IST2025-04-03T13:58:06+5:302025-04-03T13:59:15+5:30
कानपूरमध्ये एका भाजपा महिला नेत्याच्या पायात वेदना होत होत्या. कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी एका प्रायव्हेट नर्सिंग होममध्ये नेलं.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका भाजपा महिला नेत्याच्या पायात वेदना होत होत्या. कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी एका प्रायव्हेट नर्सिंग होममध्ये नेलं. उपचारादरम्यान त्यांना एक इंजेक्शन देण्यात आलं. पण काही काळानंतर रुग्णाची तब्येत आणखी बिघडली आणि मृत्यू झाला.
महिला भाजपा नेत्याच्या नातेवाईकांनी रुग्णाला चुकीचं इंजेक्शन देण्यात आल्यामुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. कुटुंबातील सदस्यांनी यानंतर नर्सिंग होममध्ये गोंधळ घातला. यावेळी नर्सिंग होममधील काही स्टाफनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रकरण शांत झाले.
"आईच्या पायामध्ये खूप वेदना होत होत्या"
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या महिला नेत्या सुनीता शुक्ला यांचा पाय खूप दुखत असल्याने त्या उपचार घेण्यासाठी नर्सिंग होममध्ये आल्या होत्या. त्यांच्या मुली तृप्ती आणि रिचा देखील त्यांच्यासोबत होत्या. मुलींनी सांगितलं की, आईच्या पायामध्ये खूप वेदना होत होत्या. आम्ही उपचारासाठी नर्सिंग होममध्ये आलो होतो. त्यावेळी रुग्णालयात डॉक्टर नव्हते. तिथे फक्त कंपाउंडर आणि नर्स होत्या.
"रुग्णालय प्रशासनाच्या लोकांनी मारहाण केली"
थोड्याच वेळात त्यांनी आमच्या आईला थेट आयसीयूमध्ये नेलं. आम्हाला माहीत नाही की, त्यांनी तिथे असं कोणतं इंजेक्शन दिलं की, आईची प्रकृती बिघडली आणि नंतर तिचा मृत्यू झाला. जेव्हा आम्ही आईच्या मृत्यूबद्दल प्रश्न विचारू लागलो तेव्हा रुग्णालय प्रशासनाच्या लोकांनी आम्हाला मारहाण केली. गोंधळ सुरू होताच पोलीस आणि भाजपाचे नेते घटनास्थळी पोहोचले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.