दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 08:26 IST2025-07-14T08:25:28+5:302025-07-14T08:26:19+5:30
Changur Baba News : छांगुर बाबाने धक्कादायक कबुली दिली आहे की, त्याच्या टोळीचं सर्वात मोठं नेटवर्क दुबई आणि नेपाळमध्ये पसरलेलं आहे.

दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?
अवैध धर्मांतरणाच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असलेल्या छांगुर बाबाने धक्कादायक कबुली दिली आहे की, त्याच्या टोळीचं सर्वात मोठं नेटवर्क दुबई आणि नेपाळमध्ये पसरलेलं आहे. या परदेशी कारभाराची सूत्रं नीतू उर्फ नसरीन हीच सांभाळत होती. परदेशातून येणारा पैसा आणि विविध संस्थांना दिली जाणारी मदत यासाठी इच्छुक असलेले लोक नीतूच्याच संपर्कात होते, अशी माहिती छांगुर बाबाने रिमांडच्या चौथ्या दिवशी एटीएस अधिकाऱ्यांसमोर दिली. रविवारीही एटीएसने परदेशी फंडिंगबद्दल सर्वाधिक प्रश्न विचारले.
लोक स्वतःहून धर्मांतरासाठी यायचे!
एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छांगुर बाबाला धर्मांतराविषयी विचारलं असता तो सतत एकच रट लावत होता की, त्याने कोणतंही अवैध धर्मांतर केलेलं नाही. सगळ्यांनी स्वतःच्या इच्छेने इस्लाम धर्म स्वीकारला. वार्षिक उरुसाबद्दल विचारलं असता तो म्हणाला की, सर्वकाही लोकांच्या समोरच होत होतं. दर्ग्याजवळच्या वार्षिक उरुसामध्ये प्रत्येक धर्माचे लोक येत होते. जेव्हा त्याला पैसे देऊन इस्लाम धर्म स्वीकारायला लावण्याबद्दल विचारलं, तेव्हा मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली.
नीतू काय म्हणाली?
त्याच्या समोरच नीतूला विचारण्यात आलं की, ती पैसे कुठे-कुठे खर्च करत होती. यावर तिने छांगुर बाबाकडे बोट दाखवत सांगितलं की, 'हेच ठरवत होते किती रक्कम कुठे खर्च करायची.' एटीएसने रिमांडवर चौकशी करताना दोघांनी दिलेल्या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे त्यांच्यावर कठोरताही दर्शवली.
कुठे आहेत खाती आणि कोणी केली मदत?
एटीएसने जेव्हा दोघांना आणि टोळीतील इतर सदस्यांची किती खाती कुठे-कुठे आहेत, असं विचारलं, तेव्हा दोघांनीही परस्परविरोधी उत्तरं दिली. छांगुर बाबा म्हणाला की, त्याला फक्त त्याच्या खात्याबद्दल माहिती आहे. तर नीतूने सांगितलं की, छांगुरच सगळ्या खात्यांचा हिशेब ठेवत होता. तिला फक्त तिच्या नावावर असलेल्या आठ खात्यांबद्दल माहिती आहे. तिच्या या खात्यांपैकी तीन खाती वेगवेगळ्या संस्थांच्या नावावर आहेत. एटीएसने धर्मांतरणाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले. सूत्रांनुसार, एटीएस या दोघांना आजमगड आणि श्रावस्ती येथेही चौकशीसाठी घेऊन जाऊ शकते.