Jagan Mohan Reddy on Chandrababu Naidu:आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. चंद्राबाबू नायडू तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यामार्फत राहुल गांधींच्या संपर्कात आहेत, असा दावा जगन रेड्डींनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आले आहे.
मीडियाशी संवाद साधताना जगन मोहन रेड्डी म्हणाले, "जेव्हा राहुल गांधी मत चोरीबद्दल बोलतात, तेव्हा ते आंध्र प्रदेशबद्दल चकार शब्द काढत नाहीत. आंध्रात घोषित निकाल आणि मतमोजणीच्या दिवसाच्या निकालांमध्ये सर्वाधिक १२.५% मतांचा फरक आहे. ते अरविंद केजरीवालबद्दल का बोलत नाहीत? केजरीवाल स्वतः आमदारकीची निवडणूक हरले."
"राहुल गांधी आंध्रबद्दल न बोलण्याचे कारण म्हणजे, चंद्राबाबू नायडू रेवंत रेड्डी यांच्या माध्यमातून हॉटलाइनवर राहुल गांधींच्या संपर्कात आहेत. राहुल गांधींसारख्या व्यक्तीवर मी काय भाष्य करावे, जो स्वतः त्यांच्या कामाशी प्रामाणिक नाही," अशी प्रतिक्रिया जगन रेड्डा यांनी दिली.
जगन रेड्डींचे मुख्यमंत्री नायडूंवर आरोप जगनमोहन रेड्डी यांनी पुलिवेंदुला आणि वोंटिमिट्टा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंवर लोकशाही कमकुवत करण्याचा आरोप केला. रेड्डी यांनी आरोप केला की नायडू यांनी सत्ता मिळवण्यासाठी षड्यंत्र, हल्ला, अत्याचार, खोटेपणा आणि फसवणूक केली आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये जगन रेड्डींनी आरोप केला की, नायडू जनतेचा पाठिंबा मिळवण्याऐवजी "पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांच्या अधिकाराचा फायदा घेऊन सत्तेचा गैरवापर करत आहे. पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यापासून पोलिसांचे अत्याचार सुरू झाले आणि शेकडो पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांना धमकावण्यात आले.