चंदीगड महापौर निवडणुकीचा व्हिडीओ पाहून सरन्यायाधीश संतापले; 'लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही' म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 17:18 IST2024-02-05T17:13:28+5:302024-02-05T17:18:31+5:30
भाजपला मोठा धक्का, आपला दिलासा, निवडणुकीतील अफरातफरीचा व्हिडीओ समोर आला.

चंदीगड महापौर निवडणुकीचा व्हिडीओ पाहून सरन्यायाधीश संतापले; 'लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही' म्हणाले...
चंदीगडच्या महापौर निवडणुकीत झालेल्या अफरातफरीवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी निवडणूक अधिकाऱ्याचा मते बाद करतानाचा व्हिडीओ पाहून सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड भडकले आहेत. ही लोकशाहीची थट्टा आहे. जे काही घडले ते पाहून स्तब्ध व्हायला झाले आहे. अशाप्रकारे लोकशाहीची हत्या करण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही, अशा शब्दांत सीजेआयनी सुनावले आहे.
चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी चंद्रचूड यांनी या व्यक्तीवर खटला चालविला पाहिजे, असे म्हटले. याचबरोबर निवडणुकीचा पूर्ण व्हिडीओ सादर करण्यास सांगत नोटीस देखील जारी केली आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व रेकॉर्ड सुरक्षित करण्याचे आदेश रजिस्ट्रार जनरल यांना देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
चंदीगड महापौर निवडणुकीत मोठा घोटाळा करण्यात आला होता. यामुळे भाजपाचा उमेदवार निवडून आला होता. निवडणूक अधिकारीच नगरसेवकांची मते बाद करत असल्याचा व्हिडीओ निवडणुकीनंतर व्हायरल झाला होता. याविरोधात कुलगीप कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली. व्हिडीओमुळे सर्वोच्च न्यायालयासमोर निवडणुकीतील हेराफेरी निदर्शनास आली.
चंद्रचूड यांच्या आदेशानुसार पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे निवडणुकीच सर्व कागदपत्रे आणि व्हिडीओ जमा केले जाणार आहेत. तसेच महापालिकेची ७ फेब्रुवारीला होणारी पहिली सभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.