The Centre's economic package is a joke, an attack by Sonia Gandhi | केंद्राचे आर्थिक पॅकेज म्हणजे घोर थट्टा, सोनिया गांधींचा हल्ला

केंद्राचे आर्थिक पॅकेज म्हणजे घोर थट्टा, सोनिया गांधींचा हल्ला

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले आर्थिक पॅकेज हे घोर थट्टा आहे, अशा शब्दांत शुक्रवारी हल्ला केला. त्या म्हणाल्या,‘‘ जीव गमवत असलेल्या मजुरांचा आक्रोश या सरकारला ऐकू येत नाही की जागतिक दर्जाच्या अर्थशास्त्रज्ञांचा सल्ला. कोरोना विषाणूचे संकट असो की देशासमोरील आर्थिक प्रश्न, स्थलांतरित मजुरांच्या अडचणी असोत की उद्योग व त्यातील कामगारांसमोर असलेले प्रश्न याला सरकारकडे कोणतेही उत्तर नाही.’’
२२ विरोधी पक्षांच्या व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे बोलावलेल्या बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. पश्चिम बंगाल आणि ओदिशात अम्फान वादळाने केलेली हानी पाहता राष्ट्रीय आपदा म्हणून ते जाहीर करावे व पीडित राज्यांना पुनर्वसन कामासाठी तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

व्हिसीला उद्धव ठाकरेंची हजेरी
11 मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा विषाणू महामारी घोषित केली होती. सगळ््या विरोधी पक्षांनी सरकारसोबत उभे राहण्याचे जाहीर केले होते. परंतु, सरकारने सगळ््यांकडे दुर्लक्ष करून फक्त पंतप्रधान कार्यालयातूनच निर्णय घेतले आहेत. देशाच्या संघराज्य व्यवस्थेला सरकारने कचऱ्याची पेटी दाखवली, असे गांधी म्हणाल्या. राहुल गांधी म्हणाले की, ‘‘लॉकडाऊनचे दोन लक्ष्य आहेत. एक म्हणजे आजाराचा फैलाव रोखणे आणि पुढे येणाºया आजाराशी लढण्याची तयारी करणे. परंतु, आज कोविड-१९ चे रुग्ण वाढत आहेत आणि आम्ही लॉकडाऊन काढून घेत आहोत. विचार न करता लॉकडाऊन लागू केले व त्याचे अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत.’’
लोकांच्या खात्यात साडेसात हजार रूपये भरण्यात यावेत या मागणीचा गांधी यांनी पुनरुच्चार केला व त्याला माकचे नेते सीताराम येचुरी व इतर नेत्यांनी पाठिंबा दिला. नेत्यांनी यावेळी देश आर्थिक विनाशाकडे जात असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी ए. के. अँटोनी, गुलाम नबी आझाद, अधिर रंजन चौधरी, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल, अहमद पटेल, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, शरद पवार, ममता बॅनर्जी, डेरेक ओब्रायन, प्रफुल्ल पटेल, एम. के. स्टालिन, उद्धव ठाकरे, संजय राऊत, हेमंत सोरेन, डी. राजा, शरद यादव, ओमर अब्दुल्ला, तेजस्वी यादव, मनोज झा, जयंत चौधरी, पी. के. कुन्हलिकुट्टी, उपेंद्र कुशवाह, बद्रुद्दीन अजमल, जीतन राम मांझी, जे. के. मणी, एन. के. प्रेमचंद्रन, राजू शेट्टी, टी. थिरूवामवलवन आणि प्रो. कोदंडाराम उपस्थित होते. मायावती, अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव अनुपस्थित होते.

Web Title: The Centre's economic package is a joke, an attack by Sonia Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.