एचआयव्हीवर उत्तम उपचार, केंद्राकडून थाप; देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्राचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 10:40 IST2025-11-23T10:39:38+5:302025-11-23T10:40:19+5:30
राज्य एड्स नियंत्रण संस्थेला केंद्र शासनाचा पुरस्कार

एचआयव्हीवर उत्तम उपचार, केंद्राकडून थाप; देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्राचा सन्मान
मुंबई : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेद्वारे (नाको) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील आढाव्यात काळजी आधार आणि उपचार सेवा प्रदान करण्यासाठी देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्र राज्यास सन्मान मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला (एमसॅक) विजयवाडा येथे आयोजित केलेल्या केंद्रीय समारंभात हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या काळजी आधार आणि उपचार विभागाच्या प्रमुख डॉ. चिन्मयी दास यांच्या हस्ते तो महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी, काळजी आधार आणि उपचार विभागाच्या उपसंचालक डॉ. प्रियांका वाघेला आणि सहायक संचालक प्रदीप सोनवणे यांना प्रदान करण्यात आला.
अँटी रेट्रोव्हायरल वर भर
हा सन्मान एचआयव्हीसह जगणाऱ्यासाठी अँटी रेट्रोव्हायरल थेरपी उपचार सेवा पुरवण्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीला अधोरेखित करतो. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले. राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक सुनील भोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय कंदेवाड आणि डॉ. भवानी मुरुगेसन यांनी सांगितले, हा पुरस्कार एचआयव्हीसह जगणाऱ्यांसाठी विनामूल्य आधार पुरवण्याच्या राज्याच्या कटिबद्धता अधोरेखित करतो.
महाराष्ट्र अव्वलच
नाकोच्या कामगिरी निर्देशांकानुसार ‘ग्रीन झोन’ मध्ये सर्वाधिक अँटी-रेट्रोव्हायरल उपचार केंद्रे असल्यामुळे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने आपले अव्वल स्थान मिळविले आहे. या केंद्रांनी अनेक क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामध्ये नोंदणीकृत सर्व एचआयव्ही - पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी सर्वसमावेशक थेरपी उपचार सुनिश्चित करणे. सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आधार या गोष्टींचा समावेश आहे.
पाच एआरटी सेंटर सर्वोत्कृष्ट
सप्टेंबर २०२५ च्या अंतिम गुणपत्रिकेत ७५ हून अधिक गुण मिळवलेल्या ‘ग्रीन झोन’मधील १६ केंद्रांपैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, एएफएमसी पुणे, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर आणि ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय धाराशिव या सर्वोत्कृष्ट ५ एआरटी केंद्रांचा सत्कार करण्यात आला.
खासगी सेंटरही आघाडीवर
काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय पुणे, आणि लोटस मेडिकल फाउंडेशन, कोल्हापूर या खासगी वैद्यकीय संस्थांमधील दोन एआरटी केंद्रांचा ‘ग्रीन झोन’मध्ये राहिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.