आदिपुरुषवर टीकेनंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये; भाजप आणि रा.स्व.संघही नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 06:29 IST2023-06-20T06:28:46+5:302023-06-20T06:29:00+5:30
हा लोकांच्या भावना दुखावल्याचा प्रकार असल्याची खंत भाजप आणि आरएसएसने व्यक्त केली आहे.

आदिपुरुषवर टीकेनंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये; भाजप आणि रा.स्व.संघही नाराज
- संजय शर्मा
नवी दिल्ली : ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर देश-विदेशात निर्माण झालेल्या गदारोळामुळे केंद्र सरकारची कोंडी झाली आहे. एकीकडे देशभरात निदर्शने होत असताना विरोधी पक्षांनाही त्यांच्यावर निशाणा साधण्याची संधी मिळाली आहे. शेजारी राष्ट्र नेपाळने सर्व भारतीय चित्रपटांवर बंदी घातली आहे, तर हा लोकांच्या भावना दुखावल्याचा प्रकार असल्याची खंत भाजप आणि आरएसएसने व्यक्त केली आहे.
‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून देशभरात वाद झाल्यानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. चित्रपटाचे संवाद पुन्हा लिहिण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे की, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) यावर योग्य ती कार्यवाही करत आहे. दुसरीकडे सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि सीबीएफसीचे सदस्यही संभ्रमात आहेत की, मनोज शुक्ला मुंतशीर यांच्यावर सरकारच्याच बड्या लोकांचा वरदहस्त असताना त्यांच्यावर कारवाई कशी करायची.
नेपाळमध्ये बंदी
मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, चित्रपट प्रदर्शित होऊ कसा दिला? नेपाळने या चित्रपटावर संपूर्ण देशात बंदी घातली आहे. विरोधी पक्षांनाही केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्याची संधी मिळाली आहे.
आदिपुरुष विरोधात जनता रस्त्यावर
चित्रपटातील संवाद व अन्य वादग्रस्त गोष्टींवर आक्षेप घेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली या राज्यांतील काही भागांत लोक रस्त्यांवर उतरले व त्यांनी निदर्शने केली.
या चित्रपटाचे संवादलेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांनी सुरक्षा पुरविण्याची केलेली विनंती पोलिसांनी मान्य केली आहे.
लोकांच्या भावना दुखावण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.