सिमेंटचे रस्ते फॅक्टरीत बनावे, प्रीकास्टच्या माध्यमातून ‘असेम्ब्लिंग’ करावे, नितीन गडकरी यांचं आवाहन
By योगेश पांडे | Updated: October 10, 2025 23:36 IST2025-10-10T23:34:59+5:302025-10-10T23:36:17+5:30
Nitin Gaadkari News: सध्याच्या काळात 'रोड फॅक्टरी'ची गरज असून 'प्री-कास्ट' मटेरियलच्या सहाय्याने आता रोड आणि इमारतींचे निर्माण आवश्यक आहे. विशेषत: सिमेंटचे रस्ते तर फॅक्टरीत बनले पाहिजेत. प्रीकास्टच्या माध्यमातून स्लॅब तयार झाले पाहिजे व क्रेनने आणून ते बसवले पाहिजेत, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.

सिमेंटचे रस्ते फॅक्टरीत बनावे, प्रीकास्टच्या माध्यमातून ‘असेम्ब्लिंग’ करावे, नितीन गडकरी यांचं आवाहन
- योगेश पांडे
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सिमेंट रस्त्यांच्या बांधकामात नवीन तंत्रज्ञान वापरण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सध्याच्या काळात 'रोड फॅक्टरी'ची गरज असून 'प्री-कास्ट' मटेरियलच्या सहाय्याने आता रोड आणि इमारतींचे निर्माण आवश्यक आहे. विशेषत: सिमेंटचे रस्ते तर फॅक्टरीत बनले पाहिजेत. प्रीकास्टच्या माध्यमातून स्लॅब तयार झाले पाहिजे व क्रेनने आणून ते बसवले पाहिजेत, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.
इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स नागपूर शाखेच्या वतीने 'फॉरेन्सिक सिव्हिल इंजीनियरिंग' या विषयावरील दोन दिवसीय अखिल भारतीय चर्चासत्राचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स एमएसईचे अध्यक्ष ए. डब्ल्यू जवंजाळ तसेच इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष कोठारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बांधकाम क्षेत्रातील व्यावहारिक समस्या समजून घेण्याची गरज आहे. त्याचवेळी पर्यायी बांधकाम सामग्रीच्या सहाय्याने निर्माण खर्च कमी करण्यावर भर द्यायला हवा. गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न करता बांधकाम क्षेत्रातील अभियंता तसेच हितधारक यांनी पर्यावरण पूरक आणि शाश्वत असे बांधकाम करावे, असे गडकरी म्हणाले.
प्रॅक्टिस चालत नाहीत ते वकील, आर्किटेक्ट सरकारच्या यंत्रणेत येतात
सरकारी काम करणाऱ्या अभियंत्यांमध्ये चालून जाते हा दृष्टीकोन असते व यामुळे मोठे नुकसान झाले आहे. बांधकामाच्या खराब दर्जासाठी मंत्री, लोकप्रतिनिधी अनेकदा जबाबदार असतात. मात्र अभियंत्यांनी दर्जा कायम ठेवला पाहिजे. समस्या समजून घेत बांधकाम व्हायला हवे. मात्र त्याबाबत गंभीर दृष्टीकोनाचा अभाव दिसून येतो. इमारत व रस्त्याच्या बांधकामादरम्यान सरकारी व खाजगी काम लगेच समजून येते. ज्या वकीलाची प्रॅक्टीस चालत नाही तो सरकारी वकील बनण्यासाठी राजकारण्यांच्या घरी चकरा मारतो व ज्या आर्किटेक्टची प्रॅक्टिस चालत नाहीत ते सरकारची नोकरी करतात. याला काही अपवाद असतील. मात्र सर्वसाधारणत: असे अनेक अनुभव येतात, असे गडकरी म्हणाले.