"नववर्ष साजरे करणे हराम"; फतवा काढत मुस्लीम समाजाला सेलीब्रेशन न करण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:39 IST2024-12-30T13:31:56+5:302024-12-30T13:39:33+5:30
मुस्लीम समाजातील तरुण तरुणींनी नवीन वर्ष साजरे न करण्याचा फतवा उत्तर प्रदेशातून काढण्यात आला आहे.

"नववर्ष साजरे करणे हराम"; फतवा काढत मुस्लीम समाजाला सेलीब्रेशन न करण्याचा इशारा
Fatwa On New Year Celebration: २०२४ वर्ष संपत आले असताना लोकांनी २०२५ च्या स्वागताची तयारी सुरू केली आहे. अशातच आता नववर्षासंदर्भात मुस्लिमांसाठी उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक फतवा जारी करण्यात आला आहे. या फतव्यामध्ये नवीन वर्ष साजरे करणे हराम आणि गुन्हा आहे आणि जो साजरा करेल तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार असेल असं म्हटलं आहे. मुस्लिमांना असे न करण्याच्या सूचना फतव्यातून दिल्या आहेत.
ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला उपस्थित राहून शुभेच्छा देण्याविरुद्ध फतवा काढला होता. राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी म्हणतात की हे नवीन वर्ष म्हणजे इंग्रजी वर्षाची सुरुवात असते. त्यामुळे मौलानांनी फतवा काढून नववर्षाचे स्वागत न करण्याचा इशारा दिला आहे.
चश्मे दारफ्ता बरेलीने हा फतवा जारी केल्याचे रझवी यांनी सांगितले. यामध्ये मुस्लिम समाजाला नववर्षाच्या उत्सवात सहभागी न होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रझवी म्हणाले की, "नववर्ष साजरे करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी हा फतवा सांगतो की,नववर्ष साजरे करणे ही अभिमानाची गोष्ट नाही. त्यामुळे ते साजरे करु नये किंवा ते शुभेच्याही देऊ नये. मुस्लिमांसाठी अशा गैर-धार्मिक कृती निषिद्ध आहेत. नवीन मुला-मुलींना नवीन वर्ष साजरे न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुस्लिमांनी नववर्ष साजरे करणे टाळावे. मुस्लिमांनी धार्मिक कार्यात सहभागी व्हावे."
"अनेक मुस्लिम मुले-मुली नवीन वर्ष साजरे करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात.हा ख्रिश्चनांचा धार्मिक विधी आहे. इस्लाममध्ये, इतर कोणत्याही धर्माच्या धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यास किंवा त्यांचे पालन करण्यास मनाई आहे. फतव्यात असेही म्हटले आहे की, नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान नाच, गाणे, आवाज करणे, दारू पिणे आणि जुगार खेळणे या सगळ्या गोष्टी केल्या जातात ज्यांना इस्लाममध्ये सक्त मनाई आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होणारा कोणताही मुस्लिम गुन्हेगार समजला जाईल," असे मौलाना रझवी म्हणाले.