‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 05:04 IST2025-05-17T05:03:09+5:302025-05-17T05:04:19+5:30
तुर्कस्तानची कंपनी सुरक्षेशी संबंधित संवेदनशील कामे करीत आहे. या कंपनीला विमानतळांच्या स्टेक होल्डर्सच्या बैठकीत गोपनीय माहिती मिळू शकते. यामुळे सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात, असा इशारा सरकारला देण्यात आला होता.

‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: तुर्कस्तानच्या सेलेबी एव्हिएशन या कंपनीला भारतीय विमानतळांचे संवेदनशील काम देण्यासंदर्भात २०१६ पासूनच इंटेलिजन्स ब्युरोने केंद्र सरकारला वारंवार इशारा दिला होता.
ब्युरोतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कस्तानची कंपनी सुरक्षेशी संबंधित संवेदनशील कामे करीत आहे. तसेच या कंपनीला विमानतळांच्या स्टेक होल्डर्सच्या बैठकीत गोपनीय माहिती मिळू शकते. यामुळे सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात, असा इशारा सरकारला देण्यात आला होता. तुर्कस्तान भारताविरोधात वारंवार गरळ ओकत होता तसेच काश्मीरसंदर्भात विरोधी स्वर काढत होता. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे संयुक्त संचालक सुनील यादव यांनी सांगितले की, देशाची सुरक्षितता लक्षात घेता तुर्कस्तानच्या कंपनीला दिलेले काम ताबडतोब रद्द करण्यात आले आहे.
क्लिअरन्स रद्द केल्याने काय होईल?
कंपनीने तयार केलेला सिक्युरिटी प्रोग्राम चालणार नाही. कंपनीला भारताने तयार केलेला सिक्युरिटी प्रोग्राम स्वीकारावा लागेल. मात्र, हे लगेच शक्य होणार नाही. त्यामुळे कंपनीला काम बंद करावे लागेल.
कंपनीकडे होत होती ही संवेदनशील कामे
विमानतळांवर ग्राउंड हँडलिंगच्या कामात प्रवासी सेवा
कार्गो नियंत्रण व उड्डाण संचालन सेवा
सामान्य उड्डाणसेवा
कार्गो व पोस्टल सेवा
गोदाम सेवा
ब्रीज संचालन
भारताने तुर्कस्तानसोबत निभावली होती दोस्ती
२००९ मध्ये तुर्कस्तानच्या इस्तंबूल तांत्रिक विश्वविद्यालयाचा पिको उपग्रह १ अंतराळात पाठवला. त्याची क्षमता सहा महिन्यांची होती. मात्र, इस्रोच्या कुशलतेमुळे त्याने दोन वर्षे काम केले. तुर्कस्तानात २०२३ साली भीषण भूकंप आला. भारताने मानवता दाखवत अवघ्या बारा तासांत बचत सामग्री, उपकरणे, औषधे, विविध मशिन्स, मोबाइल हॉस्पिटल यासह लष्कर व एनडीआरएफची चमू पाठवली होती.
कंपनीचे गैरभारतीय अधिकारी भारतीय विमानतळे, प्रवासी उड्डाणे व वेळापत्रक या संदर्भात डेटा मागवू शकणार नाहीत. कंपनीने कामावर बहुतेक अधिकारी भारतीय ठेवले होते. मात्र, त्यांचे रिपोर्टिंग तुर्कस्तानतील मुख्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे होते.