भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:56 IST2025-08-11T15:56:18+5:302025-08-11T15:56:34+5:30
Supreme Court: रस्त्यावरून फिरणारे भटके कुत्रे ही शहरी भागातील एक गंभीर समस्या बनलेले आहे. या भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. तर अनेक लहान मुलं भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहेत.

भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
रस्त्यावरून फिरणारे भटके कुत्रे ही शहरी भागातील एक गंभीर समस्या बनलेले आहे. या भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. तर अनेक लहान मुलं भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे रात्री अपरात्री आणि अगदी दिवसाढवळ्याही भटक्या कुत्र्यांचा उपद्रव असलेल्या भागातून लोकांना जीव मुठीत धरून जावं लागतं. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांविरोधात सक्त भूमिका घेतली आहे. तसेच रस्त्यावरून मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना डॉग शेल्टर होममध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार, एमसीडी, एनडीएमसी, एनसीआरमधील प्रशासकीय यंत्रणांना शहरातील रस्ते आणि गल्लीबोळांना भटक्या कुत्र्यांच्या जाचापासून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्यात यावे आणि डॉग शेल्टर होममध्ये ठेवण्यात यावे, तसेच या संस्थांनी पुढच्या सहा आठवड्यांमध्ये ५ हजार कुत्र्यांना पकडून सुरुवात करावी, असे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत.
दरम्यान, या कामाक कुठली व्यक्ती किंवा संस्थेने अडथळा आणला तर कोर्टाला सांगा, कोर्ट त्यांच्यावर कारवाई करेल, असा सक्त इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दिल्ली एनसीआरमधील सर्व प्राधिकरणांनी त्वरित डॉग शेल्टर होम बनवावेत. तसेच त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरबाबत आठ आठवड्यांमध्ये कोर्टात माहिती द्यावी, तिथे कुत्र्यांच्या नसबंदीसाठी पुरेशा लोकांची तैनाती करावी. या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी सोडू नये. तसेच त्यांच्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवावे, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यावरून मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी लहान मुलांचे चावे घेतल्याच्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच आपल्या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी ताकिदही कोर्टाने दिली आहे.