कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 15:37 IST2025-12-13T15:37:16+5:302025-12-13T15:37:56+5:30
Captain Amarinder Singh: पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भाजपामध्ये निर्णय हे दिल्लीमध्ये घेतले जातात, तसेच आपल्याला त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं जात नाही, असेही अमरिंदर सिंग यांनी सांगितले.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी सांगितले की, भाजपामध्ये निर्णय हे दिल्लीमध्ये घेतले जातात, तसेच आपल्याला त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं जात नाही. मात्र आता पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याचा आपला कुठलाही इरादा नसल्याचेही अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. त्याबरोबरच पंजाबच्या स्थैर्यासाठी भाजपा आणि अकाली दलाची आघाडी होणं आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमरिंदर सिंग यांनी सांगितले की, भाजपामध्ये माझ्याकडून कुठलाही सल्ला घेतला जात नाही. माझ्याकडे ६० वर्षांचा राजकीय अनुभव आहे. मात्र मी स्वत:ला पक्षावर लादू इच्छित नाही. तसेच आता काँग्रेसमध्ये पुन्हा जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही अमरिंदर सिंग यांनी सांगितले.
मी काँग्रेसमध्ये असताना मला ज्या पद्धतीने मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आले, त्यामुळे मला खूप त्रास झाला होता. तो अनुभव माझ्यासाठी खूप वेदनादायी होता. मात्र असं असलं तरी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी कधी माझ्याकडे मदत मागितली तर मी त्यांना नक्कीच मदत करेन. पण त्यांना राजकीय मदत करणार नाही, असेही अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केलं.
यावेळी भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीची तुलना करताना अमरिंदर सिंग म्हणाले की, काँग्रेसमधील व्यवस्था ही अधिक लोकशाहीवादी होती. काँग्रेसमध्ये नेत्यांचा सल्ला घेतला जायचा. तसेच पक्षाच्या हायकमांडनां भेटणं सोपं होतं. उलट भाजपामध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला भेटणं हे काँग्रेसच्या हायकमांडला भेटण्याच्या तुलनेत अधिक कठीण आहे, असा अनुभव अमरिंदर सिंग यांनी सांगितले. त्याबरोबरच भाजपा आपले निर्णय सार्वजनिक करत नाही, तसेच नेत्यांशी चर्चा करण्याशिवाय निर्णय घेतले जातात, असेही त्यांनी सांगितले. मात्र अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यावेळी कौतुक केलं. तसेच मोदींच्या मनात पंजाबबाबत आपुलकी आहे, असे त्यांनी सांगितले.