7 लोकांचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद, सात दिवसांपासून सुरू होते वनविभागाचे सर्च ऑपरेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 14:28 IST2021-07-08T14:22:54+5:302021-07-08T14:28:14+5:30
Cannibal Leopard Was Imprisoned In A Cage:बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने 8 पिंजरे, 20 ट्रॅप कॅमरे लावले होते

7 लोकांचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद, सात दिवसांपासून सुरू होते वनविभागाचे सर्च ऑपरेशन
उदयपूर: उदयपूर जिल्ह्यात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला. जिल्ह्यातील जावर माइन्स परिसरात मागील 3 महिन्यात 7 लोकांचा बळी या बिबट्याने घेतला होता. वनविभागाचे 80 पेक्षा जास्त अधिकारी 7 दिवसांपासून या बिबट्याचा शोध घेत होते. आज अखेर हा बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात अडकला.
4 जिल्ह्यातील पथकं घेत होती शोध
या बिबट्याला पकडण्यासाठी मागील सात दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरू होते. यासाठी उदयपूरसह जयपूर, राजसमंद आणि चित्तौडगडवरुन विशेष पथक बोलवण्यात आले होते. ही पथक चोवीस तास बिबट्याच्या शोधात जंगलात फिरत होती. विशेष म्हणजे, बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने 8 पिंजरे, 20 ट्रॅप कॅमरे लावले होते. यांनाही बिबट्या चकवा देत होता. पण, आज अखेर बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला.
गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास
बिबट्याला पकडल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. जावर माइन्स परिसरात राहणाऱ्या हरिरामने सांगितले की, या बिबट्याच्या दहशतीमुळे गावात राहणे अवघड झाले होते. पण, आता त्याला पकडल्यामुळे आम्ही मोकळेपणाने फिरू शकतो.