Candidates should publish criminal background information three times - Election Commission | उमेदवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती तीनदा प्रसिद्ध करावी- निवडणूक आयोग

उमेदवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती तीनदा प्रसिद्ध करावी- निवडणूक आयोग

नवी दिल्ली : निवडणुकीत उभे राहणाऱ्यांनी तसेच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दलची माहिती वृत्तपत्रे किंवा दूरचित्रवाहिन्यांवर जाहिरातींच्या रूपाने तीनदा प्रसिद्ध करावी, असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे, तसेच यासंदर्भातील बदललेले नियम तातडीने लागू केले आहेत.
उमेदवाराने आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दलच्या तीन जाहिराती अशा पद्धतीने प्रसिद्ध करावयाच्या आहेत. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीआधीच्या पहिल्या चार दिवसांत पहिली जाहिरात प्रसिद्ध करायची आहे. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीआधीच्या पाच ते आठ दिवसांत दुसरी जाहिरात प्रसिद्ध करायची आहे. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीच्या नवव्या दिवसापासून ते प्रचाराची मुदत संपेपर्यंतच्या काळात तिसरी जाहिरात प्रसिद्ध करायची आहे. उदाहरणार्थ मतदानाच्या दोन दिवस आधी तिसरी जाहिरात प्रसिद्ध करायची आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. या जाहिरातींमुळे उमेदवारांची सर्व माहिती कळून कोणाला मत द्यायचे याचा ठोस निर्णय जनता घेऊ शकेल. उमेदवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयी प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातींबाबतचे बदललेले नियम बिनविरोध निवडून येणाºया उमेदवारांनाही लागू होतील, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
लोकसभा किंवा विधानसभा उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती राजकीय पक्षांनी प्रसिद्ध करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात दिला होता. ही माहिती राजकीय पक्षांनी वेबसाईटवरही देणे बंधनकारक आहे. त्यात प्रलंबित फौजदारी खटल्यांची माहितीही देण्यात यावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

कारणे स्पष्ट करा

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीलाच का उमेदवारी दिली? तशी पार्श्वभूमी नसलेल्या अन्य लोकांना उमेदवारी का दिली नाही, याची कारणेही या उमेदवाराच्या गुन्हेगारी माहितीसोबत राजकीय पक्षांनी प्रसिद्ध करायला हवीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Candidates should publish criminal background information three times - Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.