बिहारमध्ये रेल्वेस्थानकावर उमेदवारांची तोबा गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 00:45 IST2023-08-27T00:45:42+5:302023-08-27T00:45:59+5:30
शिक्षक नियुक्ती परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी परीक्षेदरम्यान ११ बनावट उमेदवार पकडले गेले. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये खळबळ उडाली.

बिहारमध्ये रेल्वेस्थानकावर उमेदवारांची तोबा गर्दी
- एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारमध्ये शिक्षक भरती परीक्षेच्या शेवटच्या दिवशी पाटणा रेल्वे स्टेशनवरील नजारा पाहण्यासारखा होता. स्टेशनवर पाय ठेवायला जागा नव्हती आणि येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे माणसांनी खचाखच भरत होत्या. रेल्वे पकडण्यासाठीची उमेदवारांची धडपड आणि त्यातून फलाटावर होत असलेली रेटारेटी हेच आज दिवसभर चित्र होते.
शिक्षक नियुक्ती परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी परीक्षेदरम्यान ११ बनावट उमेदवार पकडले गेले. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये खळबळ उडाली. यादरम्यान पाटणा स्थानकावर गाड्यांत जागा मिळवण्याची स्पर्धाही लागली होती. काही परीक्षार्थी खिडकीतून गाड्यांत शिरताना दिसत होते. उमेदवारांच्या परतीसाठी रेल्वेने शनिवारपर्यंत दररोज २८ विशेष गाड्या चालवल्या. तरीही प्रचंड गर्दी होती. शनिवारी परीक्षेच्या शेवटच्या दिवशी तर कहरच झाला.
माध्यमिकसाठी ६३ हजार तर उच्च माध्यमिक संवर्गासाठी सुमारे ३९ हजार उमेदवारांनी हजेरी लावली. बिहार लोकसेवा आयोगाने १ लाख ७० हजार ४६१ पदांसाठी भरती जारी केली आहे.