Parasocial: केंब्रिज डिक्शनरीचा मोठा निर्णय! २०२५ चा 'वर्ड ऑफ द इयर' ठरला 'पॅरासोशल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 13:59 IST2025-11-19T13:55:22+5:302025-11-19T13:59:28+5:30
Cambridge Dictionary: केंब्रिज डिक्शनरीने मंगळवारी ‘पॅरासोशल’ या शब्दाला २०२५ चा ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले आहे.

Parasocial: केंब्रिज डिक्शनरीचा मोठा निर्णय! २०२५ चा 'वर्ड ऑफ द इयर' ठरला 'पॅरासोशल'
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: केंब्रिज डिक्शनरीने मंगळवारी ‘पॅरासोशल’ या शब्दाला २०२५ चा ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले आहे. या शब्दाचा अर्थ आहे की, एखादी व्यक्ती ज्या सेलिब्रिटीला किंवा प्रसिद्ध व्यक्तीला ओळखत नाही, तिच्याशी भावनिकरीत्या जोडली गेल्याचे किंवा संबंधित असल्याचे जाणवते. यावर्षी केंब्रिजच्या शब्दकोशात सहा हजार नवीन शब्द जोडले गेले आहेत. त्यामध्ये ‘डेलुलु’, ‘स्लोप’, ‘स्कीबिडी’ व ‘ट्रेडवाइफ’, ‘डूमस्पेंडिंग’ व ‘वाइबी’ यांसारख्या शब्दांचा समावेश आहे.
‘पॅरासोशल’ म्हणजे काय?
केंब्रिजच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी लोकांना सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर्स आणि एआय चॅटबॉट्ससोबत निर्माण होणाऱ्या एकतर्फी ‘पॅरासोशल’ संबंधांमध्ये जास्त रस दिसून आला.
‘डेलुलु’, ‘डूमस्पेंडिंग’,‘स्लोप’ चर्चेत !
डेलुलु - ‘भ्रमपूर्ण’ (डेल्युझनल) या शब्दावर आधारित. याचा अर्थ, ज्या गोष्टी सत्य नाहीत किंवा वास्तविक नाहीत, त्यावर विश्वास ठेवणे.
स्लोप - इंटरनेटवरील अत्यंत कमी गुणवत्तेची सामग्री, विशेषत: जी कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे तयार केली जाते.
ट्रेडवाइफ - अशी विवाहित स्त्री जी घरी राहून स्वयंपाक, साफसफाई आणि मुलांची काळजी घेते आणि आपली ही जीवनशैली सोशल मीडियावर शेअर करते.
डूमस्पेंडिंग - स्वतःला चांगले वाटावे म्हणून आपल्या बजेटपेक्षा जास्त पैसे खर्च करणे.
वाइबी - ज्या ठिकाणी चांगले वातावरण आहे, त्याचे वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा शब्द.
संवाद साधण्याच्या पद्धतीत बदल
केंब्रिज डिक्शनरीच्या कॉलिन मॅकिन्टोश यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वेबसाइटवर ‘पॅरासोशल’ शब्दाच्या शोधात वाढ झाली आहे. हा शब्द मूळतः १९५६ मध्ये टीव्हीवरील लोकांना पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या ‘पॅरा-सोशल’ नात्यांचे वर्णन करण्यास तयार केला होता. केंब्रिज विद्यापीठाच्या प्रोफेसर सिमोन श्नॉल यांनी सांगितले की, पॅरासोशल संबंधांमुळे चाहते, सेलिब्रिटी आणि एआय यांच्याशी संवाद साधण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. लोक प्रभावशाली व्यक्तींशी एकतर्फी संबंध जोडतात, ज्यामुळे त्यांना वाटते की ते त्यांना ‘ओळखतात’ आणि त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतात.