Rafale Deal: कॅगचा अहवाल राष्ट्रपतींना सुपूर्द; वादाचं विमान पुन्हा उडण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 17:31 IST2019-02-11T17:16:10+5:302019-02-11T17:31:51+5:30
कॅगचा अहवाल उद्या संसदेत मांडला जाण्याची शक्यता

Rafale Deal: कॅगचा अहवाल राष्ट्रपतींना सुपूर्द; वादाचं विमान पुन्हा उडण्याची शक्यता
नवी दिल्ली: गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजणाऱ्या राफेल डीलबद्दलचा अहवाल कॅगनं राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे कॅगचा अहवाल संसदेत कधी मांडला जाणार, याची उत्सुकता आहे. कॅगनं आपला अहवाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवला आहे. इंग्रजी वृत्तवाहिनी टाईम्स नाऊनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
कॅगनं अहवालाची एक प्रत राष्ट्रपतींना आणि दुसरी प्रत अर्थ मंत्रालयाला पाठवली आहे. या अहवालात एकूण 12 प्रकरणं आहेत. काही आठवड्यांपूर्वीच संरक्षण मंत्रालयानं राफेलबद्दलचा सविस्तर उत्तर आणि संबंधित अहवाल कॅगला सोपवला होता. यामध्ये खरेदी प्रक्रियेबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती होती. याशिवाय 36 राफेल विमानांच्या किमतींचाही समावेश होता. कॅगचा अहवाल अतिशय मोठा असून तो प्रोटोकॉलप्रमाणे सर्वप्रथम राष्ट्रपतींना पाठवण्यात आला. यानंतर आता राष्ट्रपती भवनाकडून हा अहवाल लोकसभा आणि राज्यसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला पाठवला जाईल. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या बुधवारी संपणार आहे. त्यामुळे उद्या किंवा परवा कॅगचा अहवाल लोकसभा आणि राज्यसभेत सादर केला जाऊ शकतो.
राहुल यांनी सातत्यानं राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत राफेल खरेदीत पंतप्रधान कार्यालयानं हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. राफेल डीलमध्ये पीएमओनं समांतर वाटाघाटी केल्यानं संरक्षण मंत्रालयावर नामुष्की ओढवली. या हस्तक्षेपाचा मंत्रालयानं निषेधदेखील केला होता, असं राहुल म्हणाले. यावेळी राहुल यांनी 'द हिंदू' या वृत्तपत्रातील बातमीचा संदर्भ दिला होता.