Cabinet reshuffle : चिराग पासवानांच्या धमकीला न जुमानता मोदींनी त्यांच्या काकांना केलं मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 18:37 IST2021-07-07T18:35:44+5:302021-07-07T18:37:36+5:30
Cabinet reshuffle Update: आपल्या परवानगीशिवाय पक्षाच्या कोट्यातून मंत्रीपद देणे योग्य नसल्याचं म्हणाले होते चिराग पासवान. मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिल्यास न्यायालयात जाण्याचा दिला होता त्यांनी इशारा.

Cabinet reshuffle : चिराग पासवानांच्या धमकीला न जुमानता मोदींनी त्यांच्या काकांना केलं मंत्री
लोक जनशक्ती पार्टी (LJP) चे नेते आणि दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी मंगळवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आव्हान दिलं होतं. चिराग पासवान यांनी पाटण्यात पत्रकार परिषद घेऊन लोक जनशक्ती पार्टीतून हकालपट्टी केलेले खासदार पशुपती पारस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी केली होती. याव्यतिरिक्त त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. परंतु त्यांच्या धमकीला न जुमानता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार पशुपती पारस यांना मंत्री केलं आहे. पारस यांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला.
खासदार पशुपती पारस हे राम विलास पासवान यांचे भाऊ आणि चिराग पासवान यांचे काका आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. "माझ्या परवानगीशिवाय पक्षाच्या कोट्यातून कोणालाही मंत्रिपद देणं योग्य नाही. तसेच, रामविलास पासवान यांच्या विचारांना पायदळी तुडवत वेगळा गट स्थापन केलेल्या सदस्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. निवडणूक आयोगालाही याची माहिती देण्यात आली आहे," असं त्यांनी सांगितलं होतं. "पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना मंत्रfमंडळात घेणार नाहीत," असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला होता. परंतु बुधवारी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
#CabinetExpansion2021 | Pashupati Kumar Paras, Kiren Rijiju and Raj Kumar Singh take oath as ministers. pic.twitter.com/XzpZ1ejxdx
— ANI (@ANI) July 7, 2021
दरम्यान, या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन, रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह १२ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे मंजूर केले होते.