CAA : आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराविरोधात प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 05:55 PM2019-12-16T17:55:09+5:302019-12-16T17:55:57+5:30

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया आणि अलिगड येथी अलिगड मुस्लिम विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांना केला होता लाठीमार

CAA:Priyanka Gandhi Vadra sit on a symbolic protest near India Gate over police action during students | CAA : आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराविरोधात प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन

CAA : आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराविरोधात प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन

Next

नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला देशातील विविध भागात विरोध होत आहे. या कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या दिल्लीतील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर काल पोलिसांनी लाठीमार केला होता. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या लाठीमाराविरोधात काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी इंडिया गेट येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. 

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना प्रियंका गांधी यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच विद्यार्थ्यांवरील लाठिमाराविरोधात त्यांनी धरणे आंदोलनही केले. यावेळी प्रियंका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल, अंबिका सोनी, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल आणि ए.के. अँटनी उपस्थित होते. '' देशातील वातावरण बिघडले आहे. पोलीस विद्यापीठांमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारत आहेत. घटनेची मोडतोड केली जात आहे. आम्ही घटनेसाठी लढणार आहोत, '' असे प्रियंका गांधींना सांगितले. 

 संसदेने गेल्या आठवड्यात मंजूर केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाने प. बंगाल व ईशान्येकडील राज्ये धुमसत असताना, रविवारी देशाच्या राजधानीतही या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर आता लखनऊ, मुंबईसह देशभरातील विविध भागात आंदोलन सुरु आहे. 

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या लायब्ररीत बसून पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा निषेध विद्यार्थी करत आहेत. तसेच, जामिया विद्यापीठातील विद्यार्थी आजही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्येही उमटले. येथील नदवा कॉलेजमध्ये सोमवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलन करत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली.  

दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारानंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी याचा निषेध केला. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादानंतर विद्यापीठ प्रशासनाने सुट्या जाहीर केल्या आहेत. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने सहारनपूर, बरेली, अलिगड, बुलंदशहर, कासगंजसह 6 जिल्ह्यात कलम 144 लागू केला आहे. या जिल्ह्यांमध्ये कलम 144चे काटेकोरपणे पालन करावे, असे प्रशासनाने आदेश दिले आहेत.

Web Title: CAA:Priyanka Gandhi Vadra sit on a symbolic protest near India Gate over police action during students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.