बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 17:40 IST2025-10-06T17:40:35+5:302025-10-06T17:40:35+5:30
Election Commission Of India: निवडणूक आयोगाने आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकांची घोषणा केली आहे.

बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
Election Commission Of India: बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहार विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होणार आहे. ६ नोव्हेंबर २०२५ आणि ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मतदान होईल. यासह सहा राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील आठ जागांसाठी पोटनिवडणुका एकाच दिवशी होणार आहेत. या सर्व निवडणुकांचे निकाल १४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केले जाणार आहेत.
निवडणूक आयोगाने आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकांची घोषणा केली आहे. या पोटनिवडणुका विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांमुळे झालेल्या आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम आणि नागरोटा येथे पोटनिवडणूक होणार आहे. उमर अब्दुल्ला यांच्या राजीनाम्यामुळे आणि देवेंद्र सिंह राणा यांच्या निधनामुळे येथील जागा रिक्त झाल्या आहेत. तर, कंवरलाल यांना अपात्र घोषित करण्यात आल्यामुळे राजस्थानच्या अंता विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.
रामदास सोरेन यांच्या निधनामुळे झारखंडमधील घाटसिला परिसरात पोटनिवडणूक होणार आहे. मागंती गोपीनाथ यांच्या निधनामुळे तेलंगणातील जुबली हिल्समध्ये पोटनिवडणूक होत आहे. डॉ. काश्मीर सिंग सोहल यांच्या निधनामुळे पंजाबमधील तरनतारन येथे पोटनिवडणूक होणार आहे. लालरिंतलुआंगा सायलो यांच्या निधनामुळे मिझोरममधील दंपा अनुसूचित जमाती मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. राजेंद्र ढोलकिया यांच्या निधनामुळे ओडिशातील नुआपाडा येथे पोटनिवडणूक होणार आहे.
- जम्मू काश्मीर आणि ओडिसा येथील पोटनिवडणुकीसाठी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी नोटीस जारी होईल. २० ऑक्टोबर २०२५ ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. २२ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी केली जाईल. २४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे.
- झारखंड, मिझोरम, पंजाब तेलंगण येथील पोटनिवडणुकीसाठी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी नोटीस जारी होईल. २१ ऑक्टोबर २०२५ ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. २२ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी केली जाईल. २४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे.
- राजस्थान येथील येथील पोटनिवडणुकीसाठी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी नोटीस जारी होईल. २१ ऑक्टोबर २०२५ ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. २३ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी केली जाईल. २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे.
- ११ नोव्हेंबर २०२५ रोजी या सर्व जागांवरील पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर १४ नोव्हेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे.