बिहारमधील प्रसिद्ध व्यावसायिक गोपाल खेमका यांच्या हत्येप्रकरणी पाटणा पोलिसांनी मंगळवारी सकाळी एका हत्यारे सप्लाय करणाऱ्याला एन्काउंटरमध्ये ठार केले. बिहार पोलिसांच्या एसटीएफने (विशेष कृती दल) पाटण्यातील अवैध शस्त्रांचा व्यवसाय करणाऱ्या विकास उर्फ राजा याला चकमकीत कंठस्नान घातले.
मिळालेल्या माहितीनुसार, राजाला पोलिसांनी सोमवारीच शूटर उमेश सोबत अटक केली होती. राजाने दिलेल्या माहितीनुसार, खून करण्यासाठी वापरलेले शस्त्र हस्तगत करण्यासाठी पोलिसांचे पथक त्याला घेऊन गेले होते. याचवेळी राजाने एसटीएफ पथकावर गोळीबार केला. पोलिसांनीही त्याला प्रत्युत्तर दिले आणि या चकमकीत राजा ठार झाला.
खेमका हत्या प्रकरणात सक्रिय सहभाग
शूटर उमेशला अटक केल्यानंतर पोलिसांनी सांगितले होते की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या हल्लेखोराचा चेहरा उमेशशी जुळत होता. बिहार पोलीस आज संध्याकाळी ५ वाजता व्यावसायिक गोपाल खेमका हत्याकांडाचा खुलासा करणार आहेत. पोलीस महासंचालक विनय कुमार स्वतः पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती देतील. यावेळी एडीजी ऑपरेशन आणि पाटणा एसएसपी यांच्यासह पाटणा पोलिसांचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
कुणी दिली सुपारी?
पोलिसांनी उमेश यादवला हत्येची सुपारी देणाऱ्या व्यक्तीचे नाव अशोक शाह असल्याचे सांगितले आहे. अशोक शाहची गोपाल खेमका यांच्याशी काय दुश्मनी होती आणि त्याने त्यांना का मारले, याबाबतची माहिती पोलिसांच्या पत्रकार परिषदेत मिळण्याची शक्यता आहे.
चर्चित व्यावसायिक गोपाल खेमका हत्याकांडातील हा पहिला एन्काउंटर आहे. पाटण्यातील मालसलामी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परदामारिया घाटजवळ एसटीएफ आणि राजा यांच्यात ही चकमक झाली. येथे एका वीटभट्टीच्या आत राजा आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. एन्काउंटरनंतर येथे मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात करण्यात आले होते.
साडे तीन लाख रुपयांची सुपारी
याच परिसरातून पोलिसांनी गोपाल खेमकाचा शूटर उमेश आणि राजा यांना पकडले होते. या प्रकरणात असे समोर आले आहे की, गोपाल खेमका यांच्या हत्येसाठी साडेतीन लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्याकांडामागे व्यावसायिक गोपाल खेमका यांच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचा हात असू शकतो.
४ जुलैच्या रात्री उशिरा पाटण्यातील गांधी मैदान परिसरातील रामगुलाम चौकाजवळ गोपाल खेमका यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर खळबळ उडाली होती. हत्येपूर्वी गोपाल खेमका यांची रेकी करण्यात आली होती. शूटर उमेश यादवने सुमारे एक आठवडा गोपाल खेमका यांची रेकी केली होती आणि त्यानंतर या हत्या केली होती.