"देशात लवकरच धावेल बुलेट ट्रेन, विद्युतीकरणही पूर्णत्त्वाकडे"; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:26 IST2025-01-07T12:25:40+5:302025-01-07T12:26:25+5:30

पहिली ड्रायव्हरलेस ट्रेन बंगळुरूत धावणार

Bullet train will run in the country soon said Prime Minister Narendra Modi | "देशात लवकरच धावेल बुलेट ट्रेन, विद्युतीकरणही पूर्णत्त्वाकडे"; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास

"देशात लवकरच धावेल बुलेट ट्रेन, विद्युतीकरणही पूर्णत्त्वाकडे"; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास

अंबिका प्रसाद कानुनगो, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली / भुवनेश्वर : देशभरातील हाय-स्पीड ट्रेनची “वाढती” मागणी आणि गेल्या १० वर्षांतील आमच्या सरकारच्या काळात रेल्वे क्षेत्रात झालेल्या “ऐतिहासिक परिवर्तन”मुळे आता भारतात बुलेट ट्रेन लवकरच सुरू होईल. तो दिवस फार दूर राहिला नसल्याचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे नवीन जम्मू रेल्वे विभागाच्या उद्घाटनासह विविध रेल्वेशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर आपल्या भाषणात मोदी म्हणाले की, गेल्या दशकात रेल्वेने ‘ऐतिहासिक बदल’ पाहिले आहेत. ५०हून अधिक मार्गांवर १३६पेक्षा जास्त वंदे भारत ट्रेन धावत आहेत. भारतात पहिली बुलेट ट्रेन लवकरच धावेल, तो दिवस आता फार दूर नाही. भारताने नवीन वर्षातही कनेक्टिव्हिटीचा वेग कायम ठेवला असून, आता आपल्या देशात मेट्रोचे जाळे हजार किलोमीटरहून अधिक लांब आहे.

विकासासाठी ४ मापदंड

  • पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण
  • प्रवाशांना आधुनिक सुविधा पुरवणे
  • देशाच्या सर्व भागात कनेक्टिव्हिटी
  • रोजगार आणि उद्योग वाढविणे


आपण आता १०० टक्के विद्युतीकरणाच्या जवळ
- २०१४ पर्यंत देशातील केवळ ३५ टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले होते. आज आपण १०० टक्के विद्युतीकरणाच्या जवळ आहे.
- आम्ही सातत्याने रेल्वेचा आवाका वाढवला आहे. गेल्या १० वर्षात ३० हजार किमीपेक्षा अधिक नवे रेल्वे ट्रॅक टाकण्यात आले आहेत.

जम्मू - काश्मीर, तेलंगणा आणि ओडिशात रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू केल्याने पर्यटनाला चालना मिळेल आणि या क्षेत्रांमध्ये सामाजिक -आर्थिक विकासात प्रगती होईल. रायगडा रेल्वे विभागामुळे  सुधारणांना पाठबळ मिळेल.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

रायगडा विभागाच्या इमारतीची पायाभरणी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ऑनलाइन माध्यमातून ओडिशातील रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी केली.
  • हा रेल्वे विभाग या प्रदेशातील पर्यटन, व्यापार आणि रोजगाराला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे मोदी म्हणाले.


जम्मू रेल्वे विभागाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगळ्या जम्मू रेल्वे विभागाचे ऑनलाइन उद्घाटन केले. पूर्वी हा भाग फिरोजपूर विभागात समाविष्ट होता. रेल्वेचा हा देशातील ६९वा विभाग आहे. कटरा ते काश्मीरपर्यंत रेल्वे सेवा सुरू होण्यापूर्वी काश्मिरी लोकांची दीर्घकाळापासून असलेली ही मागणी या माध्यमातून पूर्ण झाली आहे. मंगळवारी कटरा ते काश्मीर प्रकल्पाची अंतिम चाचणी होत आहे. यामुळे येथे रोजगारात मोठी वाढ होणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पहिली ड्रायव्हरलेस ट्रेन बंगळुरूत धावणार

  • टीटागड रेल सिस्टीम्स लिमिटेडने सोमवारी आपली पहिली ड्रायव्हरलेस मेड इन इंडिया ट्रेनसेट बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या यलो लाइनला सुपूर्द केली.
  • देशातील शहरी वाहतूक व्यवस्थेतील हा मैलाचा दगड आहे. स्टेनलेस स्टील बॉडी असलेली स्वयंचलित ट्रेन इलेक्ट्रॉनिक्स सिटीला उर्वरित बंगळुरूशी जोडणाऱ्या १८ किमीच्या मार्गावर धावेल.
  • मेट्रो रेल्वेमध्ये भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाच वर्षांत अमेरिकेला मागे सोडण्याचे ध्येय असल्याचे केंद्रीय शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी म्हटले आहे.

Web Title: Bullet train will run in the country soon said Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.