थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 23:54 IST2025-12-24T23:53:56+5:302025-12-24T23:54:31+5:30
Vishnu statue On Thailand-Cambodia Border: गेल्या काही दिवसांपासून थायलंड आणि कंबोडिया या देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. यादरम्यान, थायलंडच्या सैन्याने काही दिवसांपूर्वी कंबोडियाच्या वादग्रस्त सीमाभागामध्ये असलेली विष्णूची मूर्ती तोडली.

थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप
गेल्या काही दिवसांपासून थायलंड आणि कंबोडिया या देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. यादरम्यान, थायलंडच्या सैन्याने काही दिवसांपूर्वी कंबोडियाच्या वादग्रस्त सीमाभागामध्ये असलेली विष्णूची मूर्ती तोडली. बुलडोझरच्या मदतीने मूर्ती पाडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर थायलंडच्या सैन्याने केलेल्या या कृत्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
भारतानेही विष्णूची मूर्ती पाडण्याच्या वृत्तांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारचं कृत्य हे केवळ धार्मिक भावनाच दुखावत नाही तर संस्कृतीलाही हानी पोहोचवतात. ही मूर्ती आपल्या संयुक्त सांस्कृतिक वारशाचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया भारताने व्यक्त केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, आम्ही हल्लीच वादग्रस्त सीमा क्षेत्रातील हिंदू देवतेची मूर्ती तोडण्यासंबंधीचा अहवाल पाहिला आहे. हिंदू आणि बौद्ध देवी देवता संपूर्ण दक्षिण-पूर्व आशियामध्ये पूजल्या जातात. तसेच त्या आपला संयुक्त सांस्कृतिक वारसा आहे.
जायसवाल यांनी पुढे सांगितले की, प्रादेशिक दावे काही असले तरी अशा प्रकारचं अमानास्पक कृत्य करणं हे पूर्णपणे गैर आहे. यामुळे केवळ धार्मिक भावनाच दुखावत नाही तर जगभरातील अनुयायांची मनेही दुखावली जातात. अशा घटना सामाजिक सद्भावना आणि सांस्कृतिक संबंधांना कमकुवत करतात.