BSNL MTNL to be merged VRS scheme to be offered to employees | BSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार

BSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार

नवी दिल्ली: बऱ्याच कालावधीपासून तोट्यात चालत असलेल्या भारत संचार नगर निगम लिमिटेड (BSNL) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेडबद्दल (MTNL) मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून एमटीएनएल आणि बीएसएनएलबद्दल विविध चर्चा सुरू होत्या. अखेर मोदी सरकारनं या दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. याशिवाय कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस स्कीमची घोषणादेखील करण्यात आली आहे.

मोदी सरकार एमटीएनएल आणि बीएसएनएल बंद करणार नसल्याचं दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कॅबिनेट बैठकीत स्पष्ट केलं. सरकार दोन्ही कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र सरकार या प्रकारचं कोणतंही पाऊल उचलणार नसल्याचं प्रसाद यांनी सांगितलं. तोट्यात चालणाऱ्या कंपन्यांना रुळावर आणण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचे सरकारी बॉन्ड आणले जाणार आहेत. एमटीएनएल आणि बीएसएनएलसाठी ३८ हजार कोटी रुपये उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीसाठी योजनादेखील आणली जाईल.

एमटीएनएल आणि बीएसएनएलकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन अतिशय स्वच्छ आहे. या दोन्ही कंपन्या देशासाठी संपत्ती आहेत, असं प्रसाद म्हणाले. 'नेपाळमध्ये भूकंप, काश्मीरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर बीएसएनएलकडून सहकार्य मिळतं. लष्कर आणि बँका बीएसएनएलची सेवा वापरतात. त्यामुळे बीएसएनएल आणि एमटीएनएल कंपन्या सरकार विकणार नाही. या कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करण्याचादेखील सरकारचा विचार नाही,' असं प्रसाद यांनी सांगितलं. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BSNL MTNL to be merged VRS scheme to be offered to employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.