"आम्ही बॅरिकेड्स तोडले, पण कायदा मोडणार नाही", राहुल गांधींचा आसामच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 15:05 IST2024-01-23T15:03:38+5:302024-01-23T15:05:30+5:30
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर गुवाहाटीमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

"आम्ही बॅरिकेड्स तोडले, पण कायदा मोडणार नाही", राहुल गांधींचा आसामच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा
गुवाहाटी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या असाममध्ये आहे. या यात्रेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मंगळवारी 'भारत जोडो न्याय यात्रे'ला गुवाहाटीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत त्याठिकाणी लावण्यात आलेले बॅरिकेड्स तोडले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी केली. यादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
या घटनेनंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर गुवाहाटीमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. यादरम्यान, यावेळी जनतेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "बजरंग दल याच मार्गाने गेला होता. याच मार्गावर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची रॅलीही झाली होती. येथे एक बॅरिकेड होते, आम्ही बॅरिकेड तोडले पण कायदा मोडणार नाही. आम्हाला कमकुवत समजू नका. ही काँग्रेस कार्यकर्त्यांची ताकद आहे. आसाममधील लोकांना दडपले जात आहे. विद्यार्थ्यांसोबत मला चर्चा करू दिली जात नाही. काँग्रेस कार्यकर्ते हे भाजप आणि आरएसएसला घाबरत नाहीत."
पुढे राहुल गांधी म्हणाले, "मला माहित आहे की अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यास सांगितले जात आहे, पण न्याय मिळाला पाहिजे. आम्ही तुमच्याशी लढायला आलो नाही, आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. आसाममधील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी लढण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत.'' तत्पूर्वी खानापारा येथील गुवाहाटी चौकात मोठा जनसमुदाय जमला आणि ढोल-ताशांच्या गजरात राहुल गांधींचे स्वागत करण्यात आले. आसाम काँग्रेसचे प्रभारी जितेंद्र सिंह म्हणाले, 'आम्ही बॅरिकेड्स तोडून जिंकलो आहोत.'
अहंकार ध्वस्त हुआ
— Congress (@INCIndia) January 23, 2024
असम के मुख्यमंत्री और दिल्ली में बैठे उनके मालिक का अहंकार कांग्रेस के बब्बर शेरों ने ध्वस्त कर दिया।
"कोई भी शक्ति इस यात्रा को नहीं रोक सकती" 🦁 pic.twitter.com/u3cDSPWpkA
काँग्रेसच्या यात्रेला शहरात बंदी
मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक कोंडीच्या कारणास्तव भारत जोडो न्याय यात्रेला गुवाहाटी शहरात येण्यास बंदी घालण्यात आली होती. तरी देखील खानापारा येथील गुवाहाटी चौकात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याने चौकात मोठी गर्दी झाली. कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात राहुल गांधी यांचे स्वागत केले आणि शहरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखले, लाठीचार्जही केला. या दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
These are not part of Assamese culture. We are a peaceful state. Such “naxalite tactics” are completely alien to our culture.
I have instructed @DGPAssamPolice to register a case against your leader @RahulGandhi for provoking the crowd & use the footage you have posted on your… https://t.co/G84Qhjpd8h— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) January 23, 2024
राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आसाम पोलिसांना दिले आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना मुख्यमंत्र्यांनी हे आसामी संस्कृतीचा भाग नसल्याचे म्हटले आहे. आमचे शांतताप्रिय राज्य आहे. अशाप्रकारचे नक्षलवादी डावपेच आमच्या संस्कृतीपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. राहुल गांधी यांच्यामुळे गुवाहाटीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे पोलिसांना राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.