ऐनवेळी इंडिगोचे विमान रद्द; नवविवाहित जोडप्याने व्हिडिओ कॉलवर लावली रिसेप्शनला हजेरी; आई-वडील बसले खुर्चीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:14 IST2025-12-05T13:13:37+5:302025-12-05T13:14:00+5:30
इंडिगो कंपनीच्या गोंधळामुळे एका नवविवाहित जोडप्याला त्यांच्या रिसेप्शन पार्टीला उपस्थित राहता आलं नाही.

ऐनवेळी इंडिगोचे विमान रद्द; नवविवाहित जोडप्याने व्हिडिओ कॉलवर लावली रिसेप्शनला हजेरी; आई-वडील बसले खुर्चीवर
Indigo Flight Crisis: कर्नाटकच्या हुबळी शहरात एका लग्न समारंभात नवरदेव-नवरी वेळेवर पोहोचू शकले नाहीत आणि त्यांच्या जागी त्यांच्या आई-वडिलांना रिसेप्शनच्या खुर्चीवर बसावे लागले. याचे कारण ठरले इंडिगो एअरलाइन्सची अचानक रद्द झालेली विमाने. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोच्या संकटामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. लोक कुठूनही येऊ शकत नाहीत आणि कुठेही जाऊ शकत नाहीत. कारण इंडिगोच्या विमान कंपन्या मोठ्या संख्येने रद्द केल्या जात आहेत. दरम्यान, जेव्हा लोक त्यांच्या महत्त्वाच्या कामासाठी देखील इतर शहरांमध्ये पोहोचू शकत नाहीत. यामुळेच एका जोडप्याला त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला ऑनलाइन उपस्थित राहावे लागले.
हुबळीची मेधा क्षीरसागर आणि भुवनेश्वरचा संगम दास, हे दोघेही बंगळूरुमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांचे लग्न २३ नोव्हेंबर रोजी भुवनेश्वर येथे झाले. त्यानंतर नवविवाहित जोडप्यासाठी हुबळी येथे एका मोठ्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. हुबळीतील गुजरात भवनमध्ये बुधवारी या सोहळ्यासाठी मेधाच्या कुटुंबाने जय्यत तयारी केली होती आणि सर्व लोकांना निमंत्रित केले होते.
या रिसेप्शनसाठी मेधा आणि संगम यांनी २ डिसेंबर रोजी भुवनेश्वरहून बंगळूरु आणि तिथून हुबळीसाठी विमानाचे तिकीट बुक केले होते. मात्र, २ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून विमानांना उशीर होण्यास सुरुवात झाली. ३ डिसेंबर रोजी पहाटे ४-५ वाजेपर्यंत विमान उशीराने उड्डाण करणार असल्याचे सांगितले जात होते. शेवटी, ३ डिसेंबरच्या सकाळी अचानक त्यांचे विमान रद्द झाल्याचे जाहीर झाले. याच मार्गावर काही नातेवाईकांनी भुवनेश्वर-मुंबई-हुबळी अशी विमाने बुक केली होती, त्यांनाही विमानांना उशीर होणे आणि ती रद्द होणे या त्रासाला सामोरे जावे लागले.
रिसेप्शनसाठी 'डिजिटल' तोडगा
विमान रद्द झाल्यामुळे मेधा आणि संगम वेळेवर हुबळीला पोहोचू शकले नाहीत. पण इकडे गुजरात भवनमध्ये सर्व पाहुणे जमले होते आणि तयारी पूर्ण झाली होती. मेधाची आई भावुक होत म्हणाली, "आम्हाला खूप वाईट वाटले, पण पाहुणे आले असल्यामुळे परिस्थिती सांभाळणे आवश्यक होते." यावर तोडगा म्हणून तातडीने प्रोजेक्टर आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था केली. नवविवाहित जोडपे भुवनेश्वर येथूनच ऑनलाइन रिसेप्शनला उपस्थित झाले.
नवरा नवरीऐवजी आई-वडील बसले खुर्चीवर
सोहळ्याची रीत पूर्ण करण्यासाठी, हुबळीतील रिसेप्शनमध्ये नवरदेव-नवरीसाठी ठेवलेल्या खुर्च्यांवर मेधाचे आई-वडील बसले. पडद्यावर व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित असलेल्या मेधा आणि संगमला पाहुण्यांनी आशीर्वाद दिले. अशा पद्धतीने हा ऑनलाइन रिसेप्शन सोहळा पूर्ण झाला. इंडिगोच्या विमानांच्या खोळंब्यामुळे एका जोडप्याला आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण अशा प्रकारे व्हर्चुअली साजरा करावा लागला, अशी चर्चा आता सुरु झालीय.
दरम्यान, देशभरात इंडिगोच्या विमानांना झालेल्या या विलंबामुळे शेकडो प्रवासी विमानतळांवर अडकले आहेत. दिल्ली विमानतळावर तर शुक्रवार मध्यरात्रीपर्यंत सर्व देशांतर्गत इंडिगो विमाने रद्द करण्यात आल्याची माहिती एअरपोर्ट ऑपरेटरने दिली आहे.