अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी नुकत्याच केलेल्या विधानावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भारत रशियाकडून तेल आयात करत आहे. यासंदर्भात बोलताना नवारो म्हणाले होते की, "ब्राह्मण सामान्य भारतीयांच्या खर्चावर नफा कमवत आहेत." यावर, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी शुक्रवारी नवारो यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले. एवडेच नाही, तर दोन्ही देशांमधील संबंध परस्पर आदर आणि हितसंबंधांच्या आधारावरच पुढे जात राहतील, असेही म्हटलेआहे.
पीटर नवारो यांच्या विधानावर रणधीर जायस्वाल म्हणाले, "आम्ही नवारो यांची खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने पाहिली आहेत आणि ती फेटाळत आहोत. अमेरिका आणि भारत संबंध आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. दोन्ही देशांमध्ये एक व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे, जी आमच्या सामायिक हितसंबंधांवर, लोकशाही मूल्यांवर आणि मजबूत नागरिकांच्या संबंधांवर आधारित आहे. या भागीदारीने अनेक बदलांचा आणि आव्हानांचा सामना केला आहे. दोन्ही देश ज्या ठोस अजेंड्यावर वचनबद्ध आहेत, त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे आणि हे संबंध परस्पर आदर आणि सामायिक हितसंबंधांच्या आधारावर वृद्धिंगत होतील, अशी आम्हाल आशा आहे."
काय म्हणाले होते नवारो? -तत्पूर्वी, फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत नवारो यांनी, भारताच्या रशियन तेल खरेदीसंदर्भात भाष्य करत आरोप केला होता की, "भारत क्रेमलिनसाठी एका लॉन्ड्रीशिवाय काही नाही. तो युक्रेनियन लोकांना मारतो." ते पुढे म्हणाले, "मी केवळ एवढेच म्हणेन की, भारतीय लोकांनी, येथे काय सुरू आहे, हे समजून घ्यावे. ब्राह्मण भारतीय लोकांच्या खर्चावर नफा कमवत आहेत. आपण हे थांबवायला हवे."