CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 10:55 IST2025-05-14T10:40:43+5:302025-05-14T10:55:37+5:30
CJI BR Gavai Oath Ceremony : आजपासून पुढील सात महिने गवई सरन्यायाधीश पद भूषविणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गवई यांना शपथ दिली.

CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपला. आजपासून पुढील सात महिने गवई सरन्यायाधीश पद भूषविणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गवई यांना शपथ दिली.
यामुळे सर्वोच्च न्यायालयाची धुरा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या हातात आली आहे. खन्ना यांनी न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या नावाची शिफारस केली होती. यामुळे गवई हे ५२ वे सरन्यायाधीश बनले आहेत. डीवाय चंद्रचूड वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती खन्ना यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता.
भूषण रामकृष्ण गवई हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. ते २००३ पासून ते २०१९ पर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. न्यायमूर्ती गवई यांना २४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. त्यांची निवृत्ती तारीख २३ नोव्हेंबर २०२५ आहे. भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदास आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु. गवई यांचे पुत्र आहेत.
VIDEO | Delhi: Justice Bhushan Ramkrishna Gavai takes oath as Chief Justice of India.
— Press Trust of India (@PTI_News) May 14, 2025
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/o136ayhiJM
गवई यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले आहेत. मोदी सरकारच्या २०१६ च्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करणे आणि निवडणूक रोखे योजना असंवैधानिक घोषित करणे आदी निर्णयांचा यात समावेश होता. गवई यांच्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा क्रमांक लागतो. त्यांना सात महिन्यांनी ५३ वे सरन्यायाधीश बनवले जाण्याची शक्यता आहे.
राजकारणात जाणार नाही...
गवई यांच्या घराण्याची राजकारणी पार्श्वभूमी असली तरी त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत आपण निवृत्तीनंतर राजकारणात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरन्यायाधीशपद भूषवल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कोणतीही जबाबदारी घेऊ नये, असे आपले मत असल्याचे त्यांनी सांगितले.