म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 20:00 IST2025-06-12T20:00:15+5:302025-06-12T20:00:45+5:30
Vijay Rupani :अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही दु:खद निधन झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटील दिली.

म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
गुरुवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक हृदयद्रावक आणि भीषण विमान अपघात घडला. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनकडे निघालेलं एअर इंडियाचं प्रवासी विमान एआय १७१ काही मिनिटांतच कोसळलं. या विमानात एकूण २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. या घटनेने देशभरात शोककळा पसरली आहे.
या अपघातातगुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही दु:खद निधन झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री चंद्रकांत रघुनाथ पाटील दिली असून, त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. भारतीय राजकारणातील एक प्रामाणिक आणि निष्ठावान चेहरा आज काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना जनसामान्यांमधून उमटत आहे.
"Former Gujarat CM Vijay Rupani passed away."
— News Arena India (@NewsArenaIndia) June 12, 2025
- Gujarat BJP President CR Patil confirms pic.twitter.com/B0pIt0Sf6K
विजय रूपाणी- एक शांत, संयमी आणि समर्पित नेतृत्व
विजय रूपाणी यांचा जन्म २ ऑगस्ट १९५६ रोजी म्यानमारची राजधानी रंगून येथे झाला. त्यांच्या वडिलांनी १९६० मध्ये कुटुंबासह गुजरातमधील राजकोटमध्ये स्थलांतर केलं. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता.
विद्यार्थी दशेपासूनच विजय रुपाणी यांनी सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये (ABVP) सक्रिय असलेल्या रूपाणी यांनी १९७१ मध्ये जनसंघात प्रवेश केला आणि भाजपच्या स्थापनेपासूनच पक्षाशी निष्ठावान राहिले.
राजकीय वाटचाल
२०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकली. तत्कालीन राज्यपाल वजुभाई वाला यांनी आपली जागा सोडल्याने राजकोट पश्चिम मतदारसंघात पोटनिवडणूक झाली, ज्यात भाजपने रुपाणी यांना उमेदवारी दिली. त्यांनी ही पोटनिवडणूक जिंकली आणि राजकोट पश्चिममधून आमदार झाले. त्यांना २०१४ मध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळवले आणि परिवहन, पाणीपुरवठा, कामगार व रोजगार यांसारख्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली.
फेब्रुवारी २०१६ ते ऑगस्ट २०१६ पर्यंत ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर, ७ ऑगस्ट २०१६ रोजी गुजरातचे १६ वे मुख्यमंत्री म्हणून विजय रूपाणी यांनी शपथ घेतली. २०२१ पर्यंत ते मुख्यमंत्रीपदावर कार्यरत राहिले.
एक विचारवंत आणि स्पष्टवक्ता नेता हरपला!
विजय रूपाणी हे आपल्या सौम्य आणि संयमी स्वभावामुळे ओळखले जात होते. त्यांनी कधीही आपली राजकीय विचारधारा सोडली नाही. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक सामाजिक आणि आर्थिक योजना प्रभावीपणे राबवल्या. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात एक मोठी आणि भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून, राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची अधिकृत चौकशी सुरू
सरकारकडून या अपघाताची सखोल चौकशी सुरू असून, एअर इंडियाने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक १८०० ५६९१ ४४४ जारी केला आहे.