"२०१४ च्या निवडणुकांतील पराभवास सोनिया गांधी, मनमोहन सिंगच जबाबदार"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 06:57 IST2020-12-13T02:14:12+5:302020-12-13T06:57:47+5:30
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या नव्या पुस्तकातील दावा

"२०१४ च्या निवडणुकांतील पराभवास सोनिया गांधी, मनमोहन सिंगच जबाबदार"
नवी दिल्ली : माझी राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर काँग्रेसने राजकीय दिशा गमावली, असा खळबळजनक दावा दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या ‘द प्रेसिडेन्शियल ईअर्स’ या नव्या पुस्तकात करण्यात आला आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवाला सोनिया गांधी व मनमोहन सिंग हेच जबाबदार असल्याचेही मुखर्जी यांनी म्हटले आहे.
रूपा पब्लिकेशनतर्फे हे नवे पुस्तक जानेवारी महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्या पुस्तकात मुखर्जी यांनी म्हटले आहे की, २००४ साली जर माझ्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपविली असती तर २०१४ साली काँग्रेसला पराभव पत्करावा लागला नसता असे त्या पक्षातील काही नेत्यांचे मत होते. मी मनमोहन सिंग यांच्यापेक्षा अधिक उत्तम पंतप्रधान होऊ शकलो असतो, असे मुखर्जी यांनी या पुस्तकात सुचविले आहे. प्रणब मुखर्जी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान व त्यांच्या कारभाराचे प्रतिबिंब देशाच्या स्थितीत उमटते. मनमोहन सिंग हे आघाडी वाचविण्यात मश्गुल होते व त्याचा परिणाम कारभारावर झाला. सोनिया गांधी काँग्रेस पक्षाचा कारभार हाकण्यास असमर्थ ठरत होत्या तर मनमोहन सिंग यांच्या संसदेतील मोठ्या अनुपस्थितीमुळे त्यांचा खासदारांशी व्यक्तिगत संपर्कही फारसा राहिला नाही. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी २०१५ साली केलेल्या भारत दौऱ्याच्या आठवणीही प्रणब मुखर्जी यांनी या पुस्तकात सांगितल्या आहेत.
मोदींचा कारभार काहीसा हुकूमशाही पद्धतीचा
प्रणब मुखर्जी यांनी नव्या पुस्तकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात काहीशा हुकूमशाही पद्धतीने कारभार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या परिणामी सरकार, विधिमंडळ, न्याययंत्रणा यांच्यातील संबंध ताणले गेले. अशा गोष्टींबाबत पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या कार्यकाळात सामंजस्याची भूमिका घेतली आहे का, याचे उत्तर येणारा काळच देईल.