BMW बाईक अन् वेगवान कारची धडक..! लखनौच्या सोमिताची 'ती' अखेरची बाईक राइड ठरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:47 IST2025-04-08T15:46:35+5:302025-04-08T15:47:01+5:30
अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कार चालकाचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक करू असं गुरुग्राम पोलिसांनी म्हटलं आहे.

BMW बाईक अन् वेगवान कारची धडक..! लखनौच्या सोमिताची 'ती' अखेरची बाईक राइड ठरली
गुरुग्राम - २८ वर्षीय सोमिता सिंह ही नोएडाच्या प्रतिष्ठित आयटी कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत होती. परंतु लखनौच्या या लेकीचं खरी आवड बाईक रायडिंग होती. तिची ही आवडच तिच्या आयुष्याचा अखेरचा प्रवास ठरली. गुरुग्रामच्या बादशाहपूर भागात बीएमडब्ल्यू बाईक चालवणारी सोमितानं एका कारला धडक दिली. घटनास्थळी गंभीर अवस्थेत असलेल्या सोमिताला सहकारी रायडर्सने हॉस्पिटलला नेले परंतु उपचारावेळी तिने अखेरचा श्वास घेतला.
काही आठवड्यापूर्वी सोमिता हिने एक महिला बाइकर्स ग्रुप ज्वाईन केला होता. ती स्पोर्ट्स बाइकिंगची प्रोफेशनल ट्रेनिंग घेत होती. BMW सारखी अवजड बाईक भाड्याने घेऊन सोमिताने गुरुग्राममधील लेपर्ड ट्रेल राइड प्लॅन केले होते. सर्व रायडर्स नोएडा सेक्टर १३५ हून निघाले आणि दुपारी हा अपघात झाला. एका वेगवान कारने सोमिताच्या बाईकला धडक दिली ज्यामुळे सोमिताचं बाईकवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला.
कुटुंबाला नव्हती राईडची माहिती
सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोमितानं तिच्या बाईक रायडिंगबाबत तिच्या कुटुंबाला काहीच सांगितले नव्हते. या अपघाताची माहिती मिळताच कुटुंबाला धक्का बसला. सोमिताच्या वडिलांनी घटनेनंतर पोलीस तक्रार केली. त्याआधारे अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कार चालकाचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक करू असं गुरुग्राम पोलिसांनी म्हटलं आहे.
अपघात कसा झाला?
प्राथमिक तपासानुसार, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वेगवान कारने सोमिताच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, हेल्मेट आणि सुरक्षा उपकरणे घालूनही सोमिताला गंभीर दुखापत झाली. ती बाईकवरून उडून लांब पडली. या घटनेनंतर सहकारी महिला रायडर्सने तिला हॉस्पिटलला नेले मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. सोमिता कायम शिक्षणात पुढे असायची. ती नोएडात नोकरी करत असली तरी बाइकिंगकडे ती आकर्षिक होत होती.