निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 14:23 IST2025-11-23T13:59:40+5:302025-11-23T14:23:02+5:30
निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या फेरतपासणी मोहिमेदरम्यान ३७ वर्षांपूर्वी हरवलेला एक मुलगा सापडला आहे.

निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
Election Commission SIR: लोकशाहीचा आधार म्हणून ओळखली जाणारी निवडणूक प्रक्रिया कधी कधी मानवी नात्यांना जोडणारी ठरु शकते याचा अनुभव पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्याने घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या फेरतपासणी मोहिमेदरम्यान, तब्बल जवळपास चार दशकांपूर्वी हरवलेले एक कुटुंब पुन्हा एकत्र आले आहे.
चक्रवर्ती कुटुंबासाठी १९८८ हे वर्ष कधीही न विसरता येणारं होतं, कारण याच वर्षी त्यांचा मोठा मुलगा विवेक चक्रवर्ती अचानक घरातून निघून गेला आणि त्यानंतर त्याचा कोणताही पत्ता लागला नाही. कुटुंबाने अनेक वर्षे शोध घेतला, पण कोणताही सुगावा मिळाला नाही. इतक्या वर्षांत कुटुंबाने पुन्हा भेटण्याची आशा सोडली होती. मात्र निवडणूक आयोगाच्या एसआयआर अभियानाने त्यांच्या कुटुंबियांचा आनंद परत मिळवून दिला.
या घटनेचे केंद्रस्थान ठरले विवेकचे लहान भाऊ, प्रदीप चक्रवर्ती. प्रदीप हे त्याच परिसरातील बूथ लेव्हल ऑफिसर आहेत. एसआयआर मोहिमेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक फॉर्मवर प्रदीप यांचे नाव आणि मोबाईल नंबर छापलेला होता. दुसरीकडे, विवेकचा मुलगा कोलकाता येथे राहत होता आणि त्याला आपल्या वडिलांशी संबंधित काही कागदपत्रांसाठी मदतीची गरज होती. तो आपल्या लहान काकांबद्दल (प्रदीप) अनभिज्ञ होता. कागदपत्रांच्या मदतीसाठी त्याने फॉर्मवर छापलेला नंबर पाहून प्रदीप यांना फोन केला. सुरुवातीला दोघांमध्ये केवळ कागदपत्रांवर बोलणे झाले, पण बोलता बोलता हळूहळू कुटुंबाच्या तुटलेल्या कड्या जुळू लागल्या.
प्रदीप चक्रवर्ती यांनी त्या दिवसाची आठवण सांगताना सांगितले, "माझा मोठा भाऊ १९८८ मध्ये शेवटचा घरी आला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला. आम्ही त्याला सर्वत्र शोधले, पण त्याने सर्व नाती तोडली होती. या मुलाची उत्तरे जेव्हा आमच्या कुटुंबातील केवळ आम्हालाच माहीत असलेल्या गोष्टींशी जुळू लागली, तेव्हा मला जाणवले की मी माझ्या पुतण्याशी बोलत आहे."
अखेरीस, अशाप्रकारे ३७ वर्षांपासून बेपत्ता असलेला चक्रवर्ती कुटुंबाचा मोठा मुलगा विवेक सापडला. या अविश्वसनीय घटनेमुळे दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाची आणि उत्साहाची लहर पसरली. त्यानंतर प्रदीप यांनी स्वतः विवेक यांच्याशी फोनवर संपर्क साधला. ३७ वर्षांच्या दीर्घ शांततेनंतर दोन भावांचे आवाज पुन्हा एकमेकांपर्यंत पोहोचले. विवेक यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, "या भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत. ३७ वर्षांच्या काळानंतर मी अखेरीस घरी परतत आहे. मी घरातील सर्व लोकांशी बोललो आहे आणि सध्या मी आनंदून गेलो आहे. मी निवडणूक आयोगाचे मनापासून आभार मानतो, कारण जर ही एसआयआर प्रक्रिया नसती, तर ही भेट कदाचित कधीच शक्य झाली नसती."
अशाप्रकारे, मतदार यादीतील त्रुटी सुधारण्यासाठी सुरू असलेल्या या अभियानाने केवळ मतदार यादी अद्ययावत केली नाही, तर एक तुटलेले कुटुंब पुन्हा आनंदाने जोडण्याचे कार्य केले.