आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 12:15 IST2025-09-26T12:12:37+5:302025-09-26T12:15:36+5:30
इंस्टाग्रामवरील प्रेम भोवलं! मुंबईतील १८ वर्षीय मुलगी ११०० किमीचा प्रवास करून प्रियकराच्या शहरात पोहोचली, पण...

आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
सोशल मीडियाच्या माध्यमातून फुललेल्या प्रेमासाठी अनेकजण वाट्टेल ते करायला तयार होतात. अशीच एक घटना समोर आली आहे. मुंबईतील एका १८ वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी तब्बल ११०० किलोमीटरचा प्रवास एकटीने केला. पण, तिचा प्रियकर मात्र तिला भेटायला आलाच नाही, ज्यामुळे तिच्या प्रेमाच्या स्वप्नांचा चुराडा झाला.
नेमकं काय घडलं?
मुंबईमध्ये राहणारी ही तरुणी तिच्या मामाच्या मुलीच्या लग्नासाठी मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात आली होती. याच लग्नामध्ये तिची ओळख बलवानी गावातील एका तरुणाशी झाली. त्यांच्यात थोडंफार बोलणं झालं आणि त्यानंतर दोघांनी इंस्टाग्रामवर मैत्री केली. हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
या तरुणासाठी तरुणी इतकी वेडी झाली होती की, तिने आपल्या घरच्यांना कोणतीही कल्पना न देता, त्याला भेटण्यासाठी थेट मुंबईहून श्योपूर गाठण्याचा निर्णय घेतला. तिने रेल्वेने ११०० किलोमीटरचा लांब पल्ल्याचा प्रवास एकटीने केला. विशेष म्हणजे, तिचा ठावठिकाणा कोणाला कळू नये म्हणून तिने आपला फोनही सोबत आणला नव्हता.
बस स्थानकावर प्रेमाच्या स्वप्नांचा चक्काचूर!
मुंबईहून श्योपूर गाठल्यानंतर तरुणी बस स्थानकावर प्रियकराची वाट पाहत थांबली. अनेक तास तिने त्याची वाट पाहिली. दरम्यान, तिने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन लागला नाही. बराच वेळानंतर जेव्हा तिचा फोन लागला, तेव्हा त्याने तिला भेटायला येण्यास स्पष्ट नकार दिला.
आपल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा असा घात झाल्यामुळे ती खूप घाबरली आणि निराश झाली. ती बस स्थानकाजवळ एकटी आणि हताश बसलेली पाहून एका दुकानदाराला संशय आला. त्याने तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती दिली.
पोलिसांनी कुटुंबाकडे सोपवले
कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीने बस स्थानकावर पोहोचले आणि तरुणीला पोलीस ठाण्यात घेऊन आले. सुरुवातीला घाबरून तिने खोटी माहिती दिली, पण नंतर तिने कबूल केले की ती तिच्या प्रियकराला भेटायला आली होती. पोलिसांनी तातडीने मुंबईतील तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. माहिती मिळताच तिचे कुटुंबीय श्योपूरमध्ये पोहोचले. पोलिसांनी तरुणीला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले आणि ते तिला घेऊन मुंबईला परतले.
पोलिसांनी याबद्दल माहिती देताना म्हटले की, "इंस्टाग्रामवरील प्रेम आणि विश्वास यातून तरुणीने एवढा मोठा प्रवास केला. परंतु, तिच्या प्रियकराने धोका दिल्याने तिला मानसिक त्रास झाला. आम्ही तिला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबाकडे सोपवले आहे."