मणिपूर हादरले! पहाटेच्या वेळी तीन शक्तिशाली IED स्फोट, सुरक्षा यंत्रणांनाही धक्का, दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:56 IST2026-01-05T16:48:01+5:302026-01-05T16:56:15+5:30
Manipur Blast: हल्ल्यातून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा यंत्रणांना संशय

मणिपूर हादरले! पहाटेच्या वेळी तीन शक्तिशाली IED स्फोट, सुरक्षा यंत्रणांनाही धक्का, दोन जखमी
Manipur Blast: मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटना काहीशा कमी होत असतानाच, राज्याला एक मोठा धक्का बसला. सोमवारी पहाटेच्या सुमारास बिष्णुपूर जिल्ह्यात तीन शक्तिशाली स्फोटांनी संपूर्ण राज्य हादरले. स्फोटांचे आवाज इतके शक्तिशाली होते की लोक झोपेत असताना हादरले आणि किंचाळले, असे काहींनी सांगितले. मणिपूरचे खोरे आणि टेकड्यांमधील भागात झालेल्या या आयईडी स्फोटांमुळे सुरक्षा यंत्रणांना धक्का बसला. हा हल्ला केवळ बॉम्बस्फोट नव्हता तर दहशत पसरवण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता असे म्हटले जात आहे.
बिष्णुपूर प्रदेशात मेईतेई समुदायाची वस्ती
मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात प्रामुख्याने मेईतेई समुदायाची वस्ती आहे. सायटन गावाजवळ झालेल्या संशयास्पद आयईडी स्फोटात मेईतेई समुदायातील एक महिला आणि एक पुरूष जखमी झाले. केंद्रीय सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले की, ही घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. स्फोटानंतर घटनास्थळी जमलेल्या स्थानिकांना या स्फोटामागे कुकीबहुल चुराचंदपूर जिल्ह्यातील गुन्हेगारांचा सहभाग असल्याचा संशय आहे. हे लोक बिष्णुपूरच्या सीमेवर असतात.
हल्ल्याचा संशय आणि निषेध
एकीकडे काहींनी त्यांच्यावर संशय व्यक्त केला असताना, सरकारशी चर्चा करत असलेल्या कुकी झो कौन्सिलने सकाळी ११:३५ वाजता एक निवेदन जारी करून हल्ल्याचा निषेध केला. त्यात अधिकाऱ्यांना आणि सुरक्षा दलांना सुरक्षा राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, स्फोटात वापरलेले साहित्य आणि त्यात सहभागी असलेल्यांची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू आहे. अलिकडेच १०० हून अधिक विस्थापित मेईतेई कुटुंबे परतल्यानंतर बिष्णुपूर-चुराचंदपूर परिसरात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.
१६ डिसेंबरला तोरबुंग परिसरात अज्ञात व्यक्तींनी कुटुंबांवर गोळीबार केला. मे २०२३ पासून, मेईतेई-कुकी संघर्षात २६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ६०,००० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. फेब्रुवारी २०२५ पासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.