संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 15:29 IST2025-09-07T15:27:16+5:302025-09-07T15:29:15+5:30

उपराष्ट्रपती निवडीच्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

BJP's two-day workshop in Parliament premises; PM Modi sits in the last row | संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...

संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...

नवी दिल्ली: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी आज(दि.7) संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा सुरू झाली आहे. या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी संसदेच्या आवारातून एक फोटो समोर आला आहे, ज्याने सर्वांनाच चकीत केले आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी स्वतः मोदी आले होते, परंतु पुढच्या रांगेऐवजी ते सामान्य कार्यकर्त्यांसारखे सभागृहाच्या शेवटच्या रांगेत बसलेले दिसले.

भाजपच्या राज्यसभा खासदार संगीता बलवंत यांनी सोशल मीडियावर कार्यशाळेचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्या मागच्या रांगेत बसून कार्यशाळेत सहभागी झाल्याचे दिसत आहे. परंतु त्यांच्यापासून थोड्या अंतरावर पंतप्रधान मोदीदेखील इतर खासदारांसह मागच्या रांगेत बसलेले दिसतात. या फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी एका सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे काळजीपूर्वक भाषण ऐकत असल्याचे दिसते. या कार्यशाळेत पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त अमित शाह, जेपी नड्डा आणि इतर अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदार सहभागी आहेत. 

कार्यशाळेत खासदारांसाठी चार सत्रे
कार्यशाळेत नवीन जीएसटी स्लॅबच्या घोषणेबद्दल खासदारांकडून पंतप्रधानांचे अभिनंदन केले जाण्याची शक्यता आहे. तसेच, कार्यशाळेत पक्षाचा इतिहास आणि विकास, तसेच खासदारांसाठी कार्यक्षमता वाढवण्यासाठी टिप्स दिल्या जातील. या कार्यशाळेत खासदारांसाठी चार सत्रे असतील, पहिले सत्र आत्मनिर्भर भारत, स्वदेशी भारत, व्यवसाय सुलभता आणि युवा शक्ती आणि रोजगार यावर असेल. दुसरे सत्र खासदारांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करावा यावर असेल. तिसरे सत्र खासदारांच्या स्थायी समितीच्या गटांवरील चर्चेवर असेल. चौथे सत्र सागरी प्रदेश, डाव्या विचारसरणीचा प्रदेश, ग्रामीण भाग, शहरी भाग, डोंगराळ आणि ईशान्य प्रदेश यावरील चर्चेवर आधारित असेल.

पंतप्रधान सूर्य घर योजना, टीबी मुक्त भारत, खासदार क्रीडा, टिफिन बैठक आणि संसदीय मतदारसंघांमधील सक्रियतेतील नवकल्पना यावरही कार्यशाळेत चर्चा केली जाईल. तसेच, उद्या खासदारांना उपराष्ट्रपती निवडणुकीवर प्रशिक्षण दिले जाईल.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट स्पर्धा आहे. संख्याबळाच्या बाबतीत, एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. येत्या ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.
 

Web Title: BJP's two-day workshop in Parliament premises; PM Modi sits in the last row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.