Hamid Ansari: 'पाकिस्तानी पत्रकाराला गुप्त माहिती पुरवली', हमीद अन्सारींवर भाजपचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 19:23 IST2022-07-13T19:17:13+5:302022-07-13T19:23:50+5:30
भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी पाकिस्तानच्या एका पत्रकाराला गुप्त माहिती पुरवली आणि त्याचा वापर ISIने केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Hamid Ansari: 'पाकिस्तानी पत्रकाराला गुप्त माहिती पुरवली', हमीद अन्सारींवर भाजपचा गंभीर आरोप
नवी दिल्ली: एका पाकिस्तानी पत्रकाराच्या खुलाशानंतर भाजपने काँग्रेस नेते आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावर टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, 'पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी खुलासा केला की, तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी तिला पाच वेळा भारतात आमंत्रित केले होते. अन्सारींनी यादरम्यान अति संवेदनशील आणि गोपनीय माहिती दिली. ही माहिती आयएसआयसोबत शेअर करुन भारताविरोधात वापरली गेली.'
'काँग्रेसने उत्तर द्यावे'
दरम्यान, 'ही गोपनीय माहिती शेअर करायची हे काँग्रेस सरकारचे धोरण होते का?' असा सवालही भाटिया यांनी विचारला. तसेच, 'देशातील जनतेने अन्सारींना खूप आदर दिला. त्या बदल्यात त्यांनी काय दिले? 2010 मध्ये अन्सारी यांनी पत्रकारांना दहशतवादाच्या चर्चासत्रात आमंत्रित केले. काँग्रेस पक्षाने याचे उत्तर द्यायला हवे,' असेही ते म्हणाले.
'अन्सारींनी गोपनीय माहिती लीक केली'
ते पुढे म्हणाले की, 'हमीद अन्सारी हे इराणचे राजदूत होते, तेव्हा ते भारताच्याच सुरक्षेला छेद देत होते. माजी रॉ एजंटने हा खुलासा केला आहे. त्यांनी अशा व्यक्तींना माहिती दिली, ज्यांना ती द्यायला नको होती. त्यांनी अनेकांची ओळख उघड केली, ज्यामुळे त्यांच्या जीव धोक्यात आला.' या सगळ्यामध्ये माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे स्पष्टीकरण आले आहे. ते म्हणाले की, 'मीडिया आणि भाजप प्रवक्ते माझ्याविरुद्ध खोटे पसरवत आहेत.'