भाजपाचं ऑपरेशन लोटस, महागाई वाढवून आमदारांची खरेदी?; केजरीवालांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 16:46 IST2022-08-26T16:45:55+5:302022-08-26T16:46:31+5:30
'देशात जर कोणी चांगला शिक्षणमंत्री असेल तर ते सिसोदिया आहेत' असं कौतुक केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत पुन्हा केले.

भाजपाचं ऑपरेशन लोटस, महागाई वाढवून आमदारांची खरेदी?; केजरीवालांचा मोठा दावा
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर बिहारमधील राजकीय उलथापालथीत नितीश कुमारांनी भाजपाचाच गेम केला. भाजपासोबत सरकार कोसळल्यानंतर नितीश कुमारांनी आरजेडीलासोबत घेत सरकार स्थापन केले. महाराष्ट्र, बिहारनंतर देशात दिल्लीतील राजकारणाची चर्चा सुरु झाली आहे. याठिकाणी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर झालेल्या सीबीआय कारवाईनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
मी लवकरच ऑपरेशन लोटसवर खुलासा करणार असल्याचं दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली. आमदारांना विकत घेण्यासाठी त्यांनी ८०० कोटी ठेवले आहेत. सीबीआय आणि ईडीकडून आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत. देशात महागाई वाढवून भाजपा आमदारांची खरेदी करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. प्रत्येक आमदाराला २० कोटींची ऑफर आली आहे असा दावा आपनं केला आहे.
तसेच 'देशात जर कोणी चांगला शिक्षणमंत्री असेल तर ते सिसोदिया आहेत' असं कौतुक केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत पुन्हा केले. दिल्ली विधानसभेचे आजपासून विशेष अधिवेशन सुरू झाले. सीएम केजरीवाल यांनी विधानसभेत आपल्या भाषणाची सुरुवात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कौतुकाने केली. केजरीवाल म्हणाले की, देशात जर कोणी चांगला शिक्षणमंत्री असेल तर ते मनीष सिसोदिया आहेत. सिसोदिया यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. दिल्ली सरकार पाडण्याचा डाव आहे. मनिषवर खोटे आरोप करून त्यांच्यावर छापे टाकल्याचे त्यांनी सांगितले. घरात कसून चौकशी करण्यात आली मात्र सीबीआयला काहीही मिळाले नाही. आलेल्या ३-३५ लोकांच्या जेवणाचा खर्चही निघत नाही. वरून आदेश आला की मनीष सिसोदिया त्यांच्यासोबत आले तर सर्व खटले बंद केले जातील असा दावाही विधानसभेत केजरीवालांनी केला.
महाराष्ट्रात ५० खोके अन् दिल्लीत २० खोके नारा
महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी शिंदे गटाला चांगलेच जेरीस आणले होते. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षातील आमदारांकडून ५० खोके, एकदम ओके अशा घोषणाबाजी दिल्या जात होत्या. दिल्लीतही आजपासून सुरु झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानभवनाबाहेर २० खोके, २० खोके घोषणा दिल्या तर भाजपानं दारु स्कॅमवर सरकारविरोधात निदर्शने केली.