चकित करणारी बातमी; आजही झोपडीत राहतो भाजपाचा 'हा' आमदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 14:09 IST2019-01-28T14:07:30+5:302019-01-28T14:09:32+5:30
एखादा आमदार म्हटला की त्याचा आलिशान बंगला, महागड्या गाड्यांचा ताफा आदी आपल्या नजरेसमोर येते. मात्र मध्य प्रदेशमध्ये असा एक आमदार आहे ज्याच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घर नसल्याने तो झोपडीत राहतो.

चकित करणारी बातमी; आजही झोपडीत राहतो भाजपाचा 'हा' आमदार
भोपाळ - राजकारण्यांकडे असलेली अमाप संपत्ती हा आपल्या देशातील चर्चेचा आणि ईर्षेचा विषय. साध्या सरपंचापासून आमदार, खासदारांपर्यंत बहुतांश राजकारण्यांकडे गडगंज संपत्तीचा संचय झालेला असतो. एखादा आमदार म्हटला की त्याचा आलिशान बंगला, महागड्या गाड्यांचा ताफा आदी आपल्या नजरेसमोर येते. मात्र मध्य प्रदेशमध्ये असा एक आमदार आहे ज्याच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घर नसल्याने तो झोपडीत राहतो. सीताराम आदिवासी असे या आमदाराचे नाव असून, डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयपूर मतदारसंघातून ते काँग्रेसचे बलाढ्य नेते रामनिवास रावत यांना पराभूत करून निवडून आले आहेत.
सीताराम यांनी तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली होती. याआधी दोनवेळा त्यांना अपयश आले होते. मात्र यावेळी त्यांनी विजयश्री खेचून आणली. मात्र राजकारणात एकढी वर्षे सक्रिय राहिल्यानंतरही सीताराम यांच्याकडे राहण्यासाठी अद्याप पक्के घर नाही. ते एका झोपडीसदृश घरात अजूनही राहतात. दरम्यान, सीताराम यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने परिसरातील नागरिकांनी निधी उभारून त्यांना घर बांधून देण्याची तयारी केली आहे. आपला आमदार झोपडीत राहतो, ही बाब योग्य न वाटल्याने आम्ही त्यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतल्याचे स्थानिक सांगतात.
आमदार झाले असले तरी सीताराम यांचे राहणीमान अद्यापही ग्रामीण व्यक्तीला साजेसे आहे. ''माझ्याकडे पैसे नसल्याने मी पक्के घर बांधू शकत नाही. एकेकाळी मी काँग्रेसचा सदस्य होतो. मात्र तिथे मला पुरेसे महत्त्व मिळाले नाही. त्यामुळे मी भाजपामध्ये आलो. दोन निवडणुकीत पराभव झाला. मात्र तिसऱ्या वेळी मला विजय मिळाला.'' असे सीताराम सांगतात.
सीताराम हे आमच्यासाठी नेहमीच संघर्ष करतात. जिथे गरज असेल तिथे न डगमगता सोबत येतात. त्यामुळेच आमदार आमच्यामध्येच राहावेत, असे आम्हाला वाटते. म्हणूनच आम्ही त्यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतला, असे एका स्थानिकाने सांगितले. तर सीताराम यांची पत्नी इमरती बाई सांगते की, आम्ही अनेक वर्षे संघर्ष केला. आता दिवस बदलले आहेत. आतातरी आमची आर्थिक परिस्थिती सुधारून जीवन सुखी होईल, असे वाटते.