चंडीगड महानगरपालिकेत भाजपाचा महापौर, आप-काँग्रेसकडे बहुमत, तरीही अशी पलटवली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:27 IST2025-01-30T13:15:54+5:302025-01-30T13:27:42+5:30
Chandigarh Municipal Corporation Mayor Election: चंडीगड महानगरपालिकेच्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसला भाजपाने मोठा धक्का दिला आहे. आज झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार हरप्रीत कौर यांनी विजय मिळवला.

चंडीगड महानगरपालिकेत भाजपाचा महापौर, आप-काँग्रेसकडे बहुमत, तरीही अशी पलटवली बाजी
चंडीगड महानगरपालिकेच्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसला भाजपाने मोठा धक्का दिला आहे. आज झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार हरप्रीत कौर यांनी विजय मिळवला आहे. त्यांना १९ मतं मिळाली. तर आम आदमी पक्षाच्या उमेदवार प्रेमलता यांना १७ मतांसह पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केल्यानंतरही आप आणि काँग्रेसची तीन मतं फुटल्याचं समोर आलं आहे.
चंडीगड महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या ही ३५ आहे. तसेच चंडीगडचे खासदारही महापौर निवडणुकीत मतदान करत असल्याने एकूण मतदारांची संख्या ३६ होते. त्यात विजयी होण्यासाठी १९ मतं आवश्यक असतात. दरम्यान, महानगर पालिकेत भाजपा १६ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष आहे. तर आम आदमी पक्षाचे १३ आणि काँग्रेसचे ६ नगरसेवक आहेत. त्याशिवाय येथील खासदार मनिष तिवारी हे काँग्रेसचे असल्याने या निवडणुकीत काँग्रेस आणि आपकडे एकूण २० मतं होती. तरीही तीन मतदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसला आहे.
काँग्रेस आणि आपच्या तीन नगरसेवकांनी भाजपाच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केले. आप आणि काँग्रेसने असा दगाफटका टाळण्यासाठी आणि एक एक मत सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या सर्व नगरसेवकांना रिसॉर्टमध्ये ठेवले होते. आपचे नगरसेवक हे पंजाब पोलिसांच्या देखरेखीखाली होते. तर काँग्रेसच्या नगरसेवकांवर पक्षाचेच नेते लक्ष ठेवून होते. मात्र हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
यावेळी महापौर निवडणुकीत गुप्त मतदानपद्धतीने मतदान झाल्याने क्रॉस व्होटिंग करणाऱ्या नगरसेवकांचा शोध घेणं आप आणि काँग्रेस आघाडीसाठी कठीण जाण्याची शक्यदा आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त स्वतंत्र निरीक्षक असलेल्या पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाच्या माजी न्यायाधीश जयश्री ठाकूर यांच्या देखरेखीखाली या निवडणुका झाल्या.