भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 20:04 IST2025-12-25T20:04:30+5:302025-12-25T20:04:52+5:30
Bihar Political Update: गेल्या महिन्यात झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एनडीएने स्पष्ट बहुमतासह मोठा विजय मिळवला होता. तसेच भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र आता बिहारमधील आपल्या पक्षाचा आणखी विस्तार करण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
गेल्या महिन्यात झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एनडीएने स्पष्ट बहुमतासह मोठा विजय मिळवला होता. तसेच भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र आता बिहारमधील आपल्या पक्षाचा आणखी विस्तार करण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी इतर पक्षांमधील उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात भाजपाचा आपल्याच मित्रपक्षांच्या आमदारांवर डोळा असल्याचाही दावा केला जात आहे.
भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या आरएलएमचे नेते उपेंद्र कुशवाहा यांनी पक्षाचं बळ दाखवण्यासाठी बोलावलेल्या कार्यक्रमाला पक्षाच्या चार पैकी ३ आमदारांनी दांडी मारली. त्यामुळे हे आमदार पक्ष आणि नेते उपेंद्र कुशवाहा यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. उपेंद्र कुशवाहा यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या आमदारांमध्ये बाजपट्टीचे आमदार रामेश्वर महतो. दिनारा येथील युवा आमदार आलोक सिंह आणि मधुबनी येथील आमदार माधव आनंद यांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी हे तिन्ही आमदार भाजपाचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र आता आपल्या पक्षाच्या कार्यक्रमाला मात्र अनुपस्थित राहिले. त्यामुळे हे तिघेही लवकरच पक्षांतर करणार असल्याच्या आणि सत्ताधारी एनडीएमधील समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.