उत्तराखंडमध्ये कमळच फुलले, पण मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजपा पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 14:39 IST2018-11-21T14:11:07+5:302018-11-21T14:39:44+5:30
उत्तराखंडच्या स्थानिक स्वराज संस्थामधील निवडणुकांसाठी मैदानात उतरलेल्या 1064 उमेदवारांपैकी 1022 ठिकाणचे निकाल हाती

उत्तराखंडमध्ये कमळच फुलले, पण मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजपा पराभूत
डेहरादून - उत्तराखंड येथे रविवारी झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. येथील 84 शहरांपैकी 83 शहरांतील निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये भाजपाने बाजी मारल्याचे दिसून येते. 34 जागांवर भाजपा, 26 जागांवर काँग्रेस आणि 23 जागेवर अपक्ष उमेदवारांना विजय मिळाला आहे. तर मायावतींच्या बसपाला एका जागेवर यश प्राप्त झाले आहे. महापौर पदाच्या निवडणुकांसाठी 7 पैकी 2 जागी भाजपचे उमेदवार विजयी झाले असून 3 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे.
उत्तराखंडच्या स्थानिक स्वराज संस्थामधील निवडणुकांसाठी मैदानात उतरलेल्या 1064 उमेदवारांपैकी 1022 ठिकाणचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये भाजापाने 303, काँग्रेसने 165, बसपाने 4 आणि आम आदमी पक्षाचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवारांना सर्वात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. कारण, तब्बल 546 जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. भाजपासाठी हा निकाल आनंद देणारा असला तरी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. येथील डोईवाला मतदारसंघातून त्रिवेंद्रसिंह रावत आमदार आहेत. पण, येथील नगरपालिकेच्या जागेवर काँग्रेसच्या सुमित्रा मनवाल यांनी विजय मिळवला आहे. रावत यांनी पूर्ण ताकदीने प्रचार करुनही त्यांना येथे पराभव पत्कारावा लागला आहे.