Karnataka Assembly Election: कर्नाटकात भाजपाचा दारुण पराभव होणार, पहिल्या ओपिनियन पोल्सची धक्कादायक आकडेवारी समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 18:43 IST2023-03-29T18:43:15+5:302023-03-29T18:43:53+5:30
Karnataka Assembly Election 2023: कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होताच या निवडणुकीबाबत अंदाज वर्तवणारे ओपिनियन पोल्स समोर येऊ लागले आहेत.

Karnataka Assembly Election: कर्नाटकात भाजपाचा दारुण पराभव होणार, पहिल्या ओपिनियन पोल्सची धक्कादायक आकडेवारी समोर
कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजले असून, २२४ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होताच या निवडणुकीबाबत अंदाज वर्तवणारे ओपिनियन पोल्स समोर येऊ लागले आहेत. त्यात एबीपी न्यूज सी व्होटरने केलेल्या ओपिनियन पोलमधून कर्नाटकमधील निवडणुकीच्या निकालाबाबत धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार कर्नाटकमध्ये भाजपाचा पराभव होणार असून, काँग्रेस विजयी होईल, असे या पोलमध्ये म्हटले आहे. या ओपिनियन पोलसह इतर ओपिनियन पोलमधूनही कर्नाटकात भाजपाच्या पराभवाचं भाकित वर्तवण्यात आलं आहे.
एबीपी न्यूज आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार कर्नाटकमध्ये काँग्रेस मोठी मुसंडी मारणार आहे. कर्नाटकमध्ये एकूण २२४ जागांपैकी काँग्रेसला ११५ ते १२७ जागा मिळतील, असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर भाजपाला ६८ ते ८० आणि जनता दल सेक्युलर पक्षाला २३ ते ३५ जागा आणि इतरांना ० ते २ जागा मिळतील, असे या ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे.
ओपिनियन पोलमधील आकडेवारीनुसार कर्नाटकमधील ग्रेटर बंगळुरू क्षेत्रात ३२ जागांपैकी भाजपाला ११ ते १५, काँग्रेसला १५ ते १९ आणि जेडीएसला १ ते ३ जागा मिळतील. तर ओल्ड म्हैसूरमधील ५५ जागांपैकी भाजपाला १ ते ३, काँग्रेसला २४ ते २८ आणि जेडीएसला २६ ते २७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सेंट्रल कर्नाटकमध्ये ३५ जागांपैकी भाजपाला १२ ते १६ काँग्रेसला १८ ते २२, जेडीएसला १ ते २ आणि इतरांना ० ते १ जागा मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजपाला बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोस्टल कर्नाटकमध्ये भाजपाला ९ ते १३ आणि काँग्रेसला ८ ते १२, जेडीएसला ० ते १ आणि इतरांना ० ते १ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हैदराबाद कर्नाटक भागात भाजपाला ८ ते १२, काँग्रेसला १९ ते २३, जेडीएसला ० ते १ आणि इतरांना ० ते १ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मुंबई कर्नाटकमध्ये भाजपाला २१ ते २५, काँग्रेसला २५ ते २९, जेडीएसला ० ते १ आणि इतरांना ० ते १ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.