नवी दिल्ली - भाजप सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे आमचा पक्ष किमान आणखी ३० वर्षे केंद्रातील सत्तेत राहील. लोकशाहीत कोणत्याही पक्षाचे यश हे कठोर परिश्रमावर अवलंबून असते. जर पक्ष दिवसरात्र कष्ट करत असेल व तुम्ही स्वत:ऐवजी देशासाठी जगत असाल तर विजय तुमचाच असेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. राजधानी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात संवाद साधताना गृहमंत्री बोलत होते.
भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष असताना पक्ष पुढील तीस वर्षे केंद्रातील सत्तेत राहील असे विधान मी केले होते. केंद्रातील सत्ता मिळून आता कुठे १० वर्षे झाले आहेत. जर एखादा पक्ष चांगली कामगिरी करत असेल तर त्याला जनतेची साथ व जिंकण्याचा विश्वास मिळतो. भाजपचे सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने समान नागरी कायदा (यूसीसी) लागू केला जात आहे.
...तेव्हा राहुल गांधी व्हिएतनाममध्ये होतेलोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लोकसभेत बोलण्यासाठी वेळ दिला होता. मात्र, तेव्हा ते व्हिएतनाममध्ये होते असा दावा करत अमित शाहांनी काँग्रेस नेत्यावर टीका केली. अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी त्यांना ४२ टक्के वेळ देण्यात आला होता. त्या वेळेत कोण बोलणार हे त्यांना ठरवायचे होते. मात्र, जेव्हा संसदेत गंभीर चर्चा सुरू होती, तेव्हा ते व्हिएतनाममध्ये होते. मात्र, परत आल्यानंतर त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार बोलण्याचा आग्रह धरल्याचा आरोप करत गृहमंत्र्यांनी गांधींना लक्ष्य केले.
संविधान सभेचा निर्णयभाजपची स्थापना झाल्यापासून मुद्दा अजेंड्यावर आहे. यूसीसी लागू करणे हा संविधान सभेचा निर्णय होता. काँग्रेसला विसर पडला असावा, असे गृहमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध धर्माच्या आधारावर दिले जाणारे आरक्षण हे संविधानाचे उल्लंघन आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याला आमचा विरोध असल्याचे स्पष्ट करत काँग्रेस सरकारने कंत्राटांमध्ये अल्पसंख्याकांना दिलेल्या ४ टक्के आरक्षणाला विरोध केला. कर्नाटक सरकारने अल्पसंख्याक समुदायाला दिलेले आरक्षण हा लॉलीपॉप असल्याचे ते म्हणाले.