लोकसभेच्या आचारसंहितेआधीच भाजपा उमेदवार जाहीर करणार; बसपालाही धक्का बसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 17:00 IST2023-12-29T17:00:29+5:302023-12-29T17:00:48+5:30
केंद्रीय नेत्यांकडून सूचना येताच भाजपाने प्रत्येक मतदारसंघांत निवडणुकीची तयारी सुरु करण्यास सुरुवात केली आहे.

लोकसभेच्या आचारसंहितेआधीच भाजपा उमेदवार जाहीर करणार; बसपालाही धक्का बसणार
लोकसभा निवडणुकीच्या आचारसिंहितेचे वेध सर्वांना लागले आहेत. फेब्रुवारीमध्ये निवडणूक आयोग याची घोषणा करण्याची शक्यता आहे. यातच अयोध्येत राममंदिराची प्रतिष्ठापना करणार असल्याने देशभरात भाजपाला पोषक वातावरण निर्माण होणार आहे. याचाच फायदा भाजपाने घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
केंद्रीय नेत्यांकडून सूचना येताच भाजपाने प्रत्येक मतदारसंघांत निवडणुकीची तयारी सुरु करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी आचार संहितेची वाट न पाहता त्यापूर्वीच यादी जाहीर केली जाणार असल्याचे संकेत युपीतील भाजपा नेत्यांनी दिले आहेत. यामध्ये राज्यातील दिग्गज नेत्यांची नावे असण्याची शक्यता आहे.
राम मंदिरामुळे देशभरात राष्ट्रभक्तीची भावना असणार आहे. याचा फायदा उमेदवारांना प्रचारासाठी होणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर लगेचच उमेदवार जाहीर केले तर त्यांना प्रचारालाही सुरुवात करता येणार आहे. सध्या हा प्लॅन उत्तर प्रदेशपुरताच मर्यादित असला तरी आजुबाजुच्या राज्यांतही याचा भाजपा फायदा उठवू शकते.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस संघटन धर्मपाल सिंह यांनी सर्व जिल्हा प्रमुखांना ३० जानेवारीपर्यंत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात निवडणूक कार्यालये उघडण्यास सांगितले आहे. जागेची निवड, कार्यालयाची व्यवस्था, निवडणूक कार्यालय प्रभारींची नियुक्ती व इतर कामे केली जाणार आहेत. यामुळे उमेदवारी जाहीर झाली की उमेदवारांना मैदान तयार मिळणार आहे.
इनकमिंगही होणार...
यातच बसपाचे काही खासदार भाजपात जाण्याची शक्यता आहे. तसेच बसपाचे ताकदवर नेते देखील भाजपात जाण्याची चर्चा पक्षच्या वरिष्ठ नेत्यांत सुरु झाली आहे. त्यांच्या उमेदवारीचा निर्णय झाल्यानंतर त्यांना पक्षात सहभागी केले जाऊ शकते असे सुत्रांनी सांगितले आहे.