राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:52 IST2025-09-18T14:50:24+5:302025-09-18T14:52:27+5:30

'राहुल गांधींना भारतात बांग्लादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती आणायची आहे. '

BJP Slams Rahul Gandhi: Rahul Gandhi disappointed, Congress lost 90 elections under his leadership | राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल

राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल

BJP Slams Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज(दि.18) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन विविध मतदारांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप केला. त्यानंतर आता भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी गांधींवर जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी म्हटले की, 'राहुल गांधी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आणि जनतेच्या नाकारण्यामुळे निराश झाले आहेत. त्यामुळेच ते फक्त आरोप करतात, पण सिद्ध करण्याची वेळ येते, तेव्हा पळून जातात.'

खोटे आरोप करण्याची सवय
अनुराग ठाकूर पुढे म्हणतात, 'राहुल गांधींना खोटे आणि निराधार आरोप करण्याची सवय लागली आहे. निवडणूक आयोग त्यांच्या आरोपांची पडताळणी करण्यास सांगते आणि प्रतिज्ञापत्र देण्यास सांगते, तेव्हा ते मागे हटतात. आरोप करून नंतर माफी मागणे आणि न्यायालयाकडून फटकारे खाणे हे त्यांचे नेहमीचे काम झाले आहे. आळंद मतदारसंघाबद्दल बोलायचे झाले तर, 2023 मध्ये मतदारसंघातून नावे वगळण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले. निवडणूक आयोगाने स्वतः या संदर्भात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. निवडणूक आयोगाने आधीच मोबाईल नंबर आणि आयपी अॅड्रेस दिले. या सर्वानंतर काँग्रेसशासित कर्नाटकच्या सीआयडीने आतापर्यंत काय केले? आळंद विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारच जिंकला होता. मग काँग्रेस मते चोरून जिंकली का?' असा प्रश्न ठाकेर यांनी केला. 

हायड्रोजन बॉम्बऐवजी फुलबाजी
'ते पत्रकार परिषदेत हायड्रोजन बॉम्ब फोडणार होते, परंतु त्यांना फुलबाजीवर काम भागवावे लागले. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जवळपास ९० निवडणुका हरल्या आहेत, त्यामुळेच त्यांची निराशा वाढत आहे. त्यांना भारतात बांग्लादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती आणायची आहे. राहुल गांधींनी स्वतः पत्रकार परिषदेत कबूल केले की, ते लोकशाही वाचवण्यासाठी येथे नाहीत. जर लोकशाही वाचवायची नसेल, तर ती नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय आहे का? टूलकिटची मदत घेऊन ते सतत आपल्या संवैधानिक संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात,' असा आरोपही अनुराग ठाकूर यांनी केला.

ही दिवाळखोरी आहे: संजय सेठ
केंद्रीय मंत्री संजय सेठ म्हणाले, 'ही दिवाळखोरी आहे. तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. तुम्ही एका संवैधानिक संस्थेला दोष देत आहात. तुमचा ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, ईव्हीएम किंवा जनतेवर विश्वास नाही. म्हणूनच देशातील जनता तुम्हाला गांभीर्याने घेत नाही. तुम्हाला तिसऱ्यांदा बाजूला करण्यात आले, त्यामुळे तुम्ही तुमची निराशा निवडणूक आयोगावर काढत आहात. देशातील जनता तुम्हाला पुन्हा बाजूला करेल.'

Web Title: BJP Slams Rahul Gandhi: Rahul Gandhi disappointed, Congress lost 90 elections under his leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.