Bjp slams congress leader Rahul Gandhi Over His I Am Not Rahul Savarkar Comment | आडनाव उधार घेऊन कोणी गांधी होऊ शकत नाही; भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार
आडनाव उधार घेऊन कोणी गांधी होऊ शकत नाही; भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार

नवी दिल्ली: भारत बचाओ रॅलीला संबोधित करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी रेप इन इंडिया विधानाबद्दल माफी मागण्यास स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला. माझं नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. त्यामुळे कदापि माफी मागणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. त्यावरुन आता भाजपा नेत्यांनी राहुल यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल गांधीवर टीका केली आहे. राहुल यांनी आडनाव उधार घेतलं आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी जोरदार पलटवार केला आहे. 

राहुल यांच्या विधानाला गिरीराज सिंह यांनी ट्विटमधून प्रत्युत्तर दिलं. 'वीर सावरकर खरेखुरे देशभक्त होते. आडनाव उधार घेऊन कोणी गांधी होत नाही, कोणी देशभक्त होऊ शकत नाही. देशभक्त होण्यासाठी धमन्यांमध्ये शुद्ध हिंदुस्तानी रक्त असायला हवं. वेश बदलून अनेकांनी देशाला लुटलं आहे. मात्र आता तसं होणार नाही. हे तीनजण कोण आहेत? हे तिघे देशाचे सामान्य नागरिक आहेत का?,' असे प्रश्न उपस्थित करताना गिरीराज यांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधींचा फोटो ट्विट केला आहे. 



राहुल गांधींनी देशातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांवरुन झारखंडमधील सभेतून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला होता. मोदी म्हणाले होते मेक इन इंडिया. मात्र जिथे पाहावं तिथं रेप इन इंडिया दिसत आहे, अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं होतं. त्यावरुन काल संसदेत गदारोळ झाला. राहुल यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली. मात्र राहुल यांनी माफी मागण्यास नकार दिला.


 
गेल्या काही दिवसांपासून ईशान्य भारत धगधगतो आहे. आर्थिक मंदी, बेरोजगारीचे प्रश्न आ वासून उभे आहेत. यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून वाद निर्माण केला जात आहे. मात्र मी माझ्या विधानावर ठाम आहे. त्यामुळे माफी मागणार नाही, असं म्हणत राहुल यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी दिल्लीचा उल्लेख रेप कॅपिटल असा केला होता, याची आठवणदेखील त्यांनी करुन दिली. 

Web Title: Bjp slams congress leader Rahul Gandhi Over His I Am Not Rahul Savarkar Comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.