भाजपवर उलटविणार डाव? बंडखोरांना मंत्रिपदाची ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 06:28 AM2019-07-09T06:28:28+5:302019-07-09T06:29:15+5:30

कर्नाटकी नाट्याला नवे वळण; सर्वच मंत्र्यांचे राजीनामे

BJP to revolt? cong-jds rebels got offer of minister | भाजपवर उलटविणार डाव? बंडखोरांना मंत्रिपदाची ऑफर

भाजपवर उलटविणार डाव? बंडखोरांना मंत्रिपदाची ऑफर

Next

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे १३ महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस-जनता दल (एस)यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. बंडखोरांना मंत्री करता यावे आणि भाजपचा सरकार पाडण्याचा डाव उलटून लावावा, यासाठी दोन्ही पक्षांच्या सर्व आमदारांनी सोमवारी पदाचे राजीनामे दिले. मात्र, दोन अपक्ष मंत्री एच नागेश व आर. शंकर यांनी राजीनाम्याबरोबरच कुमारस्वामी सरकारला दिलेला पाठिंबाही काढून घेतला.


आमदाराकीचा राजीनामा दिलेले सारे जण मुंबईच्या सोफीटेल हॉटेलात मुक्कामास होते. काँग्रेस व जनता दलाच्या सर्वच मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर ते गोव्याकडे रवाना झाले आहेत. तेथून ते कर्नाटकात परतणार की, सरकार पडेपर्यंत तिथेच थांबणार, हे स्पष्ट झालेले नाही. विधानसभाध्यक्ष रमेश कुमार उद्या, मंगळवारी या आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेणार आहेत. त्यामुळे ते कदाचित उद्या बंगळुरूला जातील, असा अंदाज आहे.
दोन्ही पक्षांच्या १३ बंडखोर आमदारांना मंत्री करता यावे, यासाठीच सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही बंडखोर राजीनाम्याचा फेरविचार करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, त्यांनी असे करू नये, यासाठीच भाजप नेत्यांनी त्यांना गोव्यात नेण्याचा निर्णय घेतला, असे समजते.


कर्नाटक मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असा निर्णय उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सिद्धरामय्या, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी
यांनी काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर काही वेळातच सरकारमधील जनता दलाच्या सर्व मंत्र्यांनीही आपल्या पदांचे राजीनामे दिले. काँग्रेसच्या मंत्र्यांनी स्वत:हून राजीनामे दिले, असे वेणुगोपाल यांनी सांगितले.


काँग्रेसचे एक मंत्री रहीम मेहमूद खान यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ असे ते म्हणाले होते. पण नंतर सर्वच मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने परिस्थिती बदलली आहे.
आमचा संबंध नाही - भाजप
कर्नाटकमध्ये भाजपमुळेच राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला असल्याचा आरोप काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी लोकसभेत केला.


मात्र संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आरोप फेटाळला. ते म्हणाले की, आमचा तेथील घटनांशी काहीच
संबंध नाही. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा
दिल्यानंतर कर्नाटकमध्ये तशाच साऱ्या घटना घडत आहेत अशी उपरोधिक टीकाही राजनाथसिंह यांनी केली. (वृत्तसंस्था)

‘लवकरच फेरबदल’
कर्नाटकामध्ये लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल केले जातील, असे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी म्हणाले. राज्यातील घडामोडींची भीती वाटत नसल्याचेही ते म्हणाले. अमेरिकेतून पतरल्यानंतर त्यांनी सांगितले की, जे काही चालले आहे, त्यावर मी भाष्य करणार नाही. भाजप जे काही करत आहे, त्याच्याशी मला कर्तव्य नाही. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडण्यावर माझे लक्ष आहे. आमदारांच्या राजीनाम्याबाबत विचारता, त्यांनी बघू या काय होते ते, असे उत्तर त्यांनी दिले.

Web Title: BJP to revolt? cong-jds rebels got offer of minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.