राहुल गांधींना दिलासा, “सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर, पण...”; पूर्णेश मोदी स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 13:07 IST2023-08-05T13:06:09+5:302023-08-05T13:07:27+5:30
Rahul Gandhi Vs Purnesh Modi: मोदी आडनावावर केलेल्या टीकेमुळे भाजपचे आमदार पुर्णेश मोदींनी राहुल गांधींवर मानहानीचा दावा केला होता.

राहुल गांधींना दिलासा, “सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर, पण...”; पूर्णेश मोदी स्पष्टच बोलले
Rahul Gandhi Vs Purnesh Modi: मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. राहुल गांधी यांच्यासाठी हा सर्वांत मोठा दिलासा मानला जात आहे. शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकीही परत मिळणार आहे. राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा करणाऱ्या पूर्णेश मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.
राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर केलेल्या टीकेमुळे त्यांच्यावर भाजपचे आमदार पुर्णेश मोदी यांनी मानहानीचा दावा केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, मात्र सत्र न्यायालयात आमची कायदेशीर लढाई सुरूच राहणार आहे. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कर्नाटकातील कोलारमधील निवडणूकीच्या रॅलीमध्ये संपूर्ण मोदी जातीचा अपमान केला होता. त्यामुळे आमची लढाई या अपमानाविरोधात आहे.
प्रत्येक परिस्थितीत निर्णय हा आमच्या बाजून होता
ट्रायल न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आणि त्यांना जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. परंतु तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर ते गुजरात उच्च न्यायालयात गेले तिथेही त्यांना दिलासा मिळू शकला नाही. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत निर्णय हा आमच्या बाजून होता. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत असे घडते की ट्रायल न्यायालयाने दोषी ठरवलेल्या व्यक्तीच्या शिक्षेला स्थगिती दिली जाते, असे पुर्णेश मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, राहुल गांधींना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे राहुल गांधी यांचा खासदारकी रद्द करण्यात आली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने त्यांना त्यांची खासदारकी पुन्हा मिळणार आहे.